तासगावात उपवनसंरक्षक 30 हजारांची लाच घेताना एसीबीच्या ‘जाळ्यात’

वनविभागातील उपवनसंरक्षक कौशल्या भोसले यांना 30 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. वनविभागातील ऑपरेटर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून भोसले यांनी ही लाच स्वीकारली.

    तासगाव : येथील वनविभागातील उपवनसंरक्षक कौशल्या भोसले यांना 30 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. वनविभागातील ऑपरेटर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून भोसले यांनी ही लाच स्वीकारली. लाकूड वाहतुकीचे वाहन सोडण्यासाठी ही लाच घेण्यात आली असल्याचे समजते. सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

    तक्रारदार यांचा लाकूड वाहतुकीचा ट्रक तासगावच्या वनविभागाने महिनाभरापूर्वी पकडला होता. हा ट्रक सोडून देण्यासाठी उपवनसंरक्षक कौशल्या भोसले यांनी संबंधिताला 30 हजार रुपयांची लाच मागितली होती. या मागणीबाबत तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या विभागाने तक्रारीची दखल घेऊन तासगाव येथे सापळा रचला. त्यानुसार आज तक्रारदाराला उपवनसंरक्षक कौशल्या भोसले यांच्याकडे पाठविण्यात आले.

    यावेळी भोसले यांनी गाडी सोडायची असेल तर तीस हजार रुपये लागतील, असे सांगितले. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पुन्हा तक्रारदाराला तीस हजार रुपये घेऊन भोसले यांच्याकडे पाठवण्यात आले. यावेळी भोसले यांनी ही रक्कम वन विभाग कार्यालयातील ऑपरेटर श्रीकांत शिंदे यांच्याकडे देण्यास सांगितले.

    त्यानुसार तक्रारदार ही रक्कम घेऊन शिंदे यांच्याकडे गेला. त्यावेळी ही रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिंदे याला रंगेहाथ पकडले. कौशल्या भोसले यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.