कोरोना काळात प्रशासनाची बाजार समितीला मदत : सभापती दिनकर पाटील

    सांगली : कोरोनाच्या साथीमध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजार सुरळित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून मोलाची मदत झाली, असे प्रतिपादन सभापती दिनकर पाटील यांनी केले.

    येथील सहकार भवनच्या सभागृहात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने कोरोनामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा गौरव सभापती पाटील, उपसभापती तानाजी पाटील यांच्यासह संचालकांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे, पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

    सभापती पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात लॉकडाऊन जाहीर केले. बाजार समितीमधील अनेक दुकाने अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट आहेत. एकीकडे रुग्ण वाढत असतना अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याचे आव्हान होते. मात्र या परिस्थितीमध्ये बाजार समितीतील दुकाने सुरूठेवण्यामध्ये प्रशासनाची साथ लाभली. त्यामुळे बाजार समितीमधील व्यवहारात काही अडचण आली नाही.

    अत्यावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होणार नाही, याबाबत बाजार समितीने काळजी घेतली होती. त्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करणे बाजार समितीचे कर्तव्य आहे. असे त्यांनी सांगितले. सचिव महेश चव्हाण यांनी प्रास्तविक केले. यावेळी सहाय्यक उपनिबंधक उर्मिला राजमाने, संचालक वसंतराव गायकवाड, जीवन पाटील, अभिजित चव्हाण, दादासाहेब कोळेकर, अण्णासाहेब कोरे, कुमार पाटील, बाळासाहेब बंडगर, शीतल पाटील, मुजीर जांभळीकर उपस्थित होते.