सांगलीत पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज; पाणी पातळीवर २४ तास लक्ष

    सांगली : पावसाळा सुरु झाला की पुरस्थिती निर्माण होते. २०१९ च्या पुरस्थितीने रौद्ररुप धारण केल्यामुळे पुरस्थितीची अनाहूत भिती वाटू लागते. पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी व नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सांगली जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

    नैसर्गिक आपत्ती बाबत त्वरीत माहिती मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण कार्यालय सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी २४ x ७ नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्यासाठी १०७७ हा टोल फ्री क्रमांक ही देण्यात आला आहे. तसेच ०२३३-२६००५०० या क्रमांकावर माहिती ही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तालुका पातळीवरील सर्व तहसील कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहेत. गावपातळीवरील निष्णात पोहणाऱ्यांची यादी संकलित करुन त्यांचे दूरध्वनी क्रमांकही आपत्ती नियंत्रण केंद्रात उपलब्ध ठेवले आहेत.

    पोलीस मुख्यालयात नियंत्रण कक्ष सुरू

    लोकांना त्वरीत नैसर्गिक आपत्तीत घडलेल्या घटनांची माहिती व्हावी यासाठी पोलीस मुख्यालयातही नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्र. ०२३३-२६७२१०० असा आहे. पोलीस विभागानेही अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून तालुकापातळीवरही यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

    पूरबाधित गावांची संख्या १०४

    जिल्ह्यात १०४ गावे पुरबाधित क्षेत्रात येतात. जिल्ह्यामधील १० तालुक्यांपैकी शिराळा वाळवा, पलूस व मिरज या चार तालुक्यातून वारणा व कृष्णा नदीचा प्रवाह असल्यामुळे पुराच्या पाण्याचा फटका अधिक बसतो. जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नदी काठाजवळील १०४ गावे गावांबाबत विशेष दक्षता प्रशासनाने घेतली असून, जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील व सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होणार नाही, याची खबरदारी संबधित यंत्रणेने घेऊन त्वरीत उपाययोजना कराण्याच्या सूचना दिल्या.

    सर्वाधारण पाणी पातळी व इशारा पातळी

    आयर्विन पुलाच्या ठिकाणी सर्व साधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 35, इशारा पातळी-40, धोकादायक पातळी-45 निश्चित करण्यात आली आहे. सन 2019 मधील उच्चतम पातळी-57.6 फूट होती. ताकारी पुलाच्या ठिकाणी सर्व साधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 39, इशारा पातळी-44, धोकादायक पातळी-46, सन 2019 मधील उच्चतम पातळी-68.8 फूट होती. बहे पुलाच्या ठिकाणी सर्वसाधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 17, इशारा पातळी-21.9, धोकादायक पातळी-23.7, सन 2019 मधील उच्चतम पातळी-36.6 फूट होती. भिलवडी पुलाच्या ठिकाणी सर्वसाधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 46, इशारा पातळी-51 धोकादायक पातळी-53, सन 2019 मधील उच्चतम पातळी-64.6 फूट होती. तर अंकली पुलाच्या ठिकाणी सर्व साधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 40, इशारा पातळी-45.11, धोकादायक पातळी-50.3, सन 2019 मधील उच्चतम पातळी-62.4. इतकी होती.

    पूरनियंत्रणासाठी उपलब्ध साधनसामुग्री

    पूरनियंत्रणासाठी जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेकडे 11 बोटी, जिल्हा परिषदेकडे-33 बोटी, महसूल विभागाकडे 14 बोटी अशा एकुण 80 बोटी उपलब्ध आहेत. मिरज तालुक्यातील 17 गावांमध्ये लाईफ जॅकेट- 170, टॉर्च- 34, रोप-51, बॅग-51,मेगा फोन-17, लाईफ रिंग-51, पलूस तालुक्यातील 21 गावांमध्ये लाईफ जॅकेट- 210, टॉर्च- 42, रोप-63, बॅग-63,मेगा फोन-21, लाईफ रिंग-63, वाळवा तालुक्यातील 31गावांमध्ये लाईफ जॅकेट-310, टॉर्च-62, रोप-93, बॅग-93,मेगा फोन-31, लाईफ रिंग-93,शिराळा तालुक्यातील 6 गावांमध्ये लाईफ जॅकेट- 60, टॉर्च- 12, रोप-18, बॅग-18,मेगा फोन-6, लाईफ रिंग-18, साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. त्याबरोबर जिल्हा प्रशासनाने पुर्व तयारीच्या अनुषंगाने एन.डी.आर.एफ पुणे यांच्याकडील 2 पथके यामध्ये 25 जवान व 5 बोटी प्रत्येकी दिनांक 15 जूलै ते 31 ऑगस्ट 2021 या कालावधीत जिल्ह्यात उपलब्ध राहणार आहेत.

    औषधे व धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध

    पुराच्या काळात रोगराई व साथीचे आजार पसरू नये यासाठी आरोग्य विभागाने यंत्रणा सज्ज ठेवली असून औषधांचा पुरेशा प्रमाणात साठा तसेच वैद्यकीय अधिकाऱ्याचे पथकही त्या त्या भागात नियुक्त करण्यात आले आहे. तसेच पूरग्रस्त गावातील लोकासांठी पुरेशा प्रमाणात धान्याचा साठाही सुरक्षित ठिकाणी करण्यात आला आहे. पूरग्रस्त कुटुंबांना स्थलांतर करण्याची वेळ आली तर त्यासाठी सुरक्षित निवासाची व्यवस्था ही करण्यात आली आहे. जनावरांना सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी त्या त्या परिसरात शाळा व सार्वजनिक ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

    बांधकाम, टेलिफोन, विद्युत विभागांची तयारी

    वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर पडणारी झाडे तसेच विद्युत व टेलिफोन विभागाचे खांब त्वरीत काढण्यासाठी जिल्ह्यात संबधित विभागाने यंत्रणा उभी केली आहे, तसेच पुराच्या पाण्यामुळे बंद पडलेले मार्ग त्वरीत सुरू करण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार ठेवली आहे. प्रत्येक विभागाकडे असलेली वाहने, बोटी, लाईफ जॅकेटस् यांचीही दुरुस्ती करुन ठेवली आहे. पूरपरिस्थितीमध्ये प्रसिध्दी माध्यमांनी धरणातील पाणीसाठा नद्यांची पातळी याची माहिती खात्री करूनच द्यावी. जेणेकरून जनतेमध्ये घबराट होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पाटबंधारे विभागाची यंत्रणा सतर्क केली आहे.

    पाणी पातळीवर २४ तास लक्ष

    जिल्ह्यामध्ये व धरणाच्या परिसरात पडणाऱ्या पावसाची माहिती तसेच धरणातील पाण्याच्या साठ्याची माहिती संकलित करून दररोज किती पाणी धरणातून सोडण्यात येणार आहे. नदीच्या पाण्याची पातळी किती आहे याची माहिती नियंत्रण कक्षाला वेळच्या वेळी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्नाटकातील आलमट्टी धरण नियंत्रण प्रशासन यांच्याबरोबर समन्वय ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील आर्यविन पूल, बहे पूल, ताकारी पूल, भिलवडी पूल, अंकली पूल येथील नद्यांच्या धोका पातळीची माहिती व इशारा अद्यावतपणे देण्यासाठी यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. एस.टी. व परिवहन विभागासही जिल्ह्यातील प्रवाशांची वाहतूक सुरळीतपणे ठेवण्याबाबत सांगण्यात आले आहे.