तासगाव भुयारी गटार योजना चौकशीसाठी धरणे आंदोलन

    सांगली : नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : तासगाव नगरपालिकेने केलेले भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट आहे. जिल्हाधिकारी यांनी कामाची चौकशी करावी. झालेले काम पुन्हा नव्याने करावे. नोबल कन्स्ट्रक्शन कंपनीची बिले थांबवावीत व भ्रष्ट अधिकारी यांना निलंबित करावे. यासह इतर मागण्यासाठी सामजिक कार्यकर्ते प्रशांत केदार, रोहित भिसे, प्रवीण धेंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात धरणे आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी पाठिंबा दिला.

    महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरो-थान महा-अभियान अंतर्गत तासगाव नगरपालिकेने भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू केले आहे. या काम अतिशय दर्जाहीन आहे. टेंडरमधील नियम व अटींचे उल्लंघन करीत योजना पूर्णपणे चुकीची व बोगस पद्धतीने उभारली आहे. यामध्ये म.जि.प्राधिकरणचे अधिकारी व नोबल कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यातील अर्थपूर्ण संबंधामुळे योजना निकृष्ट झाली आहे. कंपनी व अधिकारी यांनी एकत्रित मिळून कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारला आहे. त्यामुळे योजनेचा दर्जा खालावला आहे.

    तसेच या योजनेतील अशुद्ध पाणी शुद्धीकरण प्रकल्प हा साठेनगर, धनगरवाडा, सोनारमळा या नागरी लोकवस्तीच्या मध्यभागी उभारण्यात येत आहे. तो प्रकल्प नागरी वस्तीमधून हटवावा. एकंदरीतच नोबल कंपनीने अधिकाऱ्यांना हाताशी धरत संपूर्ण काम निकृष्ट केले आहे. तेव्हा या योजनेत कंपनीने व अधिकारी यांनी शासनाची व जनतेची फसवणूक करीत कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारला आहे. त्याची सीबीआय चौकशी करावी.

    म.जी.प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विनय कुलकर्णी यांचीही कार्यालयीन व त्यांच्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करावी, या मागण्यांसाठी आंदोलन केले. या मागण्या सात दिवसांत मान्य न झाल्यास 19 जुलै 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला.