महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगलीत आंदोलन

    सांगली : महागाईच्या विरोधात आज सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी मोदी सरकार चले जाओ आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली. सर्वसामान्य जनतेला वेठीस केंद्र सरकारने धरले आहे, याचा निषेध यावेळी करण्यात आला.

    राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले, “निवडणुका आल्या की महागाई कमी केल्याचे दाखवायचे आणि निवडणूक संपली की दरात वाढ करायची आणि लोकांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केंद्र सरकार करत आहे.”

    राहुल पवार म्हणाले, “मोदी सरकारने पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढ केली आहे, याचा सर्व सामान्य जनतेला फटका बसला आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले,”गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या महामारीत अनेकांच्या नोकऱ्या आणि रोजगार गेल्या आहेत. तर अनेकांच्या मिळकतीमध्ये कपात होत आहे. त्यामुळे कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे. त्यातच केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढ भरमसाठ केली आहे.”

    यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर केंद्र शासनाविरोधातील फलक लावण्यात आले होते. आंदोलनात नगरसेवक विष्णू माने, सागर घोडके, माजी नगरसेवक शेखर माने, ज्योती अदाटे, वंदना चंदनशिवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.