अन शेतकऱ्याने वाटली ढोबळी मिरची फुकट..

लॉकडाऊन, महापूर या सगळ्या संकटातून वाचून जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे, नदीकाठी शेतीतर उध्वस्तच झाली आहे, पण घाटमाथ्यावर पिकं चांगली आहेत आणि बाजारात मात्र त्याला दर नसल्याने शेतकऱ्यांचे गणित विस्कटलेले आहे.

  सांगली : ” घ्या घ्या ढबू घ्या फुकट घ्या..!” असा आवाज गेली दोन दिवस कुंडल आणि परिसरात घुमत आहे. हा कोण्या व्यापाऱ्याचा आवाज नाही, ही आर्त हाक आहे एका शेतकऱ्याची, ढोबळी मिरचीचे दर गडगडले आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने चक्क फुकट लोकांना ढबू मिरची वाटली. ट्रॉलीभर ढबू मिरची अवघ्या १७ मिनिटांत फस्त झाली पण ; कोणाचे फुल ना फुलांची पाकळी त्या शेतकऱ्याला त्याच्या घामाचे दाम द्यायचे धारिष्ट झाले नाही हे नवलंच.

  लॉकडाऊन, महापूर या सगळ्या संकटातून वाचून जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे, नदीकाठी शेतीतर उध्वस्तच झाली आहे, पण घाटमाथ्यावर पिकं चांगली आहेत आणि बाजारात मात्र त्याला दर नसल्याने शेतकऱ्यांचे गणित विस्कटलेले आहे.

  कुंभारगाव (ता कडेगाव) हे गाव भाजीपाल्याचे माहेरघर म्हटले जाते,येथील शेतकरी नेहमी नवनवीन प्रयोग करून काळ्या आईची सेवा करत असतात. कुंडल पासून दोन किलोमीटरवरील याच गावातील भीमराव साळुंखे हे दरवर्षी 25 गुंठे ढोबळी मिरचीची लागवड करतात, ही मिरची ते मुंबई, पुणे येथे पाठवतात. वाहतूक, पॅकिंग, मजुरी यासाठी 6 रुपये किलोला खर्च येतो तेथे त्यांना पंधरा रुपये किलो दर जरी मिळाला तरी 9 रुपये किलोला ढोबळ नफा राहत होता यातूनही ते समाधानी असत, कारण खर्च वजा जाता तिन ते चार महिन्यात त्यांना लाखांचा तरी फायदा होतच होता. ढोबळी मिरचीला करप्या, दावण्या, थ्रीप्स असे रोग जास्त असल्याने एक दिवस आड तरी औषध फवारणी करावीच लागते त्यामुळे इतर भाजीपाल्यापेक्षा या पिकाला औषध फवारणीचा खर्च जास्त असतो. याशिवाय मशागत, ठिबक सिंचन, रोपे, मल्चिंग पेपर, तोडणी, वीज हा सगळा खर्च ही असतोच. पण यावर्षी ढोबळी मिरचीचे पीक चांगले आहे आणि बाजारपेठेत किलोला पाच रुपये सुद्धा दर नसल्याने तेथील व्यापाऱ्यांनी मिरची बाजारपेठेत आणू नका असे ठणकावून शेतकऱ्यांना सांगितले खरे, पण या वाक्याने ढोबळी मिरची पिकवणाऱ्या शेतकर्यांचा मात्र काळजाचा ठोकाच चुकला. कारण हातातोंडाला आलेले पीक कवडी मोल किंमतीने द्यावे लागणार होते.

  पण शेतकरी नेहमी आशावादी असतो भविष्यात परिस्थिती सुधारेल, केलेला खर्च तरी निघेल या आशेवर किमान झाडे तरी जगवावी म्हणून आलेले पीक तोडणे आवश्यक आहे, अशा परिस्थितीत बाजरपेठेत मिरची घेऊन जाऊन विकली तर येण्या जाण्याचा खर्च ही भागणार नाही म्हणून परिसरातील नागरिकांना फुकट वाटण्याचा पवित्रा त्यांनी स्वीकारला. ट्रॉली भरून भीमराव साळुंखे यांनी अंबक, चिंचणी, देवराष्ट्रे, मोहिते वडगाव, कुंडल येथे ढोबळी मिरची ट्रॉलीतून फुकट वाटली.

  अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरी देशोधडीला लागेल, शेतकऱ्याला मदतीची नाही तर पिकविलेल्या मालाला योग्य हमीभाव मिळवून देणेसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

  - भीमराव साळुंखे, शेतकरी.