मांजर वारंवार घरात येत असल्याचा आला राग; छर्‍याच्या बंदुकीतून झाडल्या फैरी

    सांगली : मिरज येथे छर्‍याच्या बंदुकीतून फैरी झाडल्याने मांजर जखमी झाले. याबाबत पोलिसांना माहिती न देता मांजरावर उपचार करणार्‍या डॉक्टरांवर करवाई करावी, अशी मागणी पीपल्स फॉर अनिमलतर्फे पोलिसांकडे करण्यात आली.

    मिरजेतील बुधवार पेठेत एका व्यक्तीने शेजारचे मांजर वारंवार घरात येत असल्याच्या रागातून पाळीव मांजरावर छर्‍याच्या बंदुकीच्या फैरी झाडल्या. दोन छरे लागल्याने मांजर जखमी झाले. मांजर पाळलेल्या शेजार्‍याने याबाबत जाब विचारल्यानंतर गोळी झाडणार्‍याने उपचारासाठी पशुवैद्यकाकडे नेले. मांजरावर शास्त्रक्रिया करुन दोन छरे काढण्यात आले. परंतु जखमी मांजराचा मृत्यू झाला.

    मांजराचा मृत्यू झाल्यानंतर छरे झाडणार्‍याने व मांजर पाळणार्‍यास भरपाई देऊन प्रकरण मिटविल्याची चर्चा आहे. मात्र, या घटनेची पोलिसांना माहिती न देता मांजरावर शस्त्रक्रिया व उपचार करणार्‍या शासकीय पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांसह बंदूकीतून छरे झाडणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी पीपल्स फ़ॉर अनिमलचे अशोक लकडे यांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.