ॲपेक्स हॉस्पिटल’ प्रकरण विधानसभेत गाजणार ; देवेंद्र फडणवीस यांना आमदार गाडगीळ यांचे निवेदन

अॅपेक्स हॉस्पिटलच्या गैरकारभाराबाबत तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलची पाहणी केली. तेथे अनेक अवैध व नियमबाह्य बाबी तसेच चुकीचे उपचार केल्याची माहिती समोर आली. डॉ. महेश जाधव व इतरांवर मिरजेत गांधी चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या दवाखान्यात ८७ रुग्णांना प्राण गमवावे लागले. डॉ. जाधव व इतरांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. सर्वाना अटक झाली.

    सांगली : ॲपेक्स कोरोना हॉस्पिटल प्रकरण विधानसभेत गाजणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना आमदार सुधीर गाडगीळ यांनी निवेदन दिले. ‘अॅपेक्स’ च्या गैरकारभारास जबाबदार असणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी करण्यात आली.

    आमदार गाडगीळ, भाजपचे संघटक सरचिटणीस दीपक माने, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सचिव अश्रफ वांकर, व्यापारी आघाडीचे रवींद्र ढगे यांनी सोमवारी फडणवीस, चंद्रकांत पाटील, दरेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

    निवेदनात म्हटले आहे की, अॅपेक्स हॉस्पिटलच्या गैरकारभाराबाबत तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलची पाहणी केली. तेथे अनेक अवैध व नियमबाह्य बाबी तसेच चुकीचे उपचार केल्याची माहिती समोर आली. डॉ. महेश जाधव व इतरांवर मिरजेत गांधी चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या दवाखान्यात ८७ रुग्णांना प्राण गमवावे लागले. डॉ. जाधव व इतरांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. सर्वाना अटक झाली.

    डॉ. जाधव यांच्यावर काही पोलिस ठाण्यात विविध तक्रारी व गुन्हे दाखल असतानाही त्यांना कोरोना हॉस्पिटल सुरू करण्यास महापालिकेकडून परवानगी देण्यात आली. ती देताना राज्य शासन, आयसीएमआर, डीएमईआर, डीएचएस या विभागांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पाहणी केली नाही. या रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या ८७ पैकी केवळ २२ रुग्णांची माहिती प्रशासनाला देण्यात आली. या हॉस्पिटलची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी. सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, अशी मागणीही आमदार गाडगीळ यांनी केली.

    फडणवीस यांनी अॅपेक्स प्रकरणी सविस्तर माहिती घेतली. हे प्रकरण विधीमंडळात धसास लावू. दोषींवर कडक कारवाई करण्यास शासनाला भाग पाडू, असे फडणवीस यांनी सांगितले.