भाजपचे आमदार आशिष शेलार आणि शेतकरी नेता राजू शेट्टी
भाजपचे आमदार आशिष शेलार आणि शेतकरी नेता राजू शेट्टी

आमदारकीच्या मोहापायी राजू शेट्टी यांची दशा 'पिंजरा' चित्रपटातील मास्तरसारखी झाली आहे, अशी बोचरी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राजू शेट्टी यांच्यावर केली. सांगली येथे किसान आत्मनिर्भर यात्रेमध्ये बोलताना त्यांनी शेट्टी यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी मंचावर सदाभाऊ खोत उपस्थित होते.

सांगली (Sangali).  आमदारकीच्या मोहापायी राजू शेट्टी यांची दशा ‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तरसारखी झाली आहे, अशी बोचरी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राजू शेट्टी यांच्यावर केली. सांगली येथे किसान आत्मनिर्भर यात्रेमध्ये बोलताना त्यांनी शेट्टी यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी मंचावर सदाभाऊ खोत उपस्थित होते.

आशिष शेलार म्हणाले की, “सत्तरच्या दशकातील ‘पिंजरा’ या चित्रपटात एका मोहापायी आदर्श असलेला शिक्षक तमाशाच्या फडावर उभा असलेला पाहिलाय. अशीच अवस्था महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या आमदारकीच्या मोहापायी शेतकऱ्यांचं नेतृत्व करु पाहणाऱ्या नेत्याची झाली आहे. त्यासाठी ते आडते आणि दलालांची वकिली करत आहेत.”

आशिष शेलार पुढं म्हणाले की, “ज्या पध्दतीनं ‘पिंजरा’ चित्रपटातल्या मास्तरांना एका मोहापायी तमाशा फडावर तुणतुणा घ्यावा लागला होता त्याच पध्दतीनं आज महाराष्ट्राच्या राजकारणात विधानपरिषदेच्या मोहापायी राजू शेट्टींना घ्यावी लागतेय. दलाल आणि अडत्यांसाठी शेतकऱ्यांची बाजू त्यांनी सोडली असेल पण मोदी आणि फडणवीसांनी शेतकऱ्यांची बाजू सोडली नाही. आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या बाजूचे आहोत.”

छत्रपती शाहू महाराज यांनी निर्माण केलेले बाजारपेठेचे कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहेत. 15 -20 वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाचा कायदा आता देशात होत असेल तर यांचा विरोध का ? याचे उत्तर आधी द्या, असा सवालही आशिष शेलार यांनी केला.

माजी खासदार राजू शेट्टीनी गेल्या लोकसभेवेळी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यानंतर केंद्राच्या कृषी धोरणांवरुन त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत भाजपची साथ सोडली. पण त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत हे मात्र भाजपसोबतच राहिले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींना पराभवाचा धक्का बसला होता.

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या यादीत राजू शेट्टी यांचं नाव आहे. ती यादी राज्यपालांना पाठवण्यात आली असून राज्यपालांनी अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारकी मिळणार आहे. एकेकाळी उस आंदोलन असो वा दूध दर वाढीचं आंदोलन असो, राजू शेट्टी यांनी सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांनी या प्रश्नावर बारामतीमध्ये जाऊन आंदोलन केलं होतं.

विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी राजू शेट्टींनी शरद पवार यांची बारामती येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. ही भेट राजकीय स्वरुपाची नव्हती असंही स्पष्टीकरण त्यावेळी राजू शेट्टी यांनी दिलं होतं. नंतरच्या काळात राष्ट्रवादीच्या वाटेला आलेल्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या कोट्यातून राजू शेट्टी यांना पाठवायचं राष्ट्रवादीनं निश्चित केलं. राष्ट्रवादीने पाठवलेल्या विधानपरिषद आमदारकीचा प्रस्ताव स्वीकारायचा की नाही यावरुन शेतकरी संघटनेत मतभेद होते. आमदारकी कोणी घ्यावी यासाठीही मतभेद निर्माण झाले होते. शेवटी राजू शेट्टी यांनीच आमदारकी घ्यावी असा निर्णय घेण्यात आला.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला विरोध म्हणून राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात कोल्हापूरात आंदोलन केलं. तसेच या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचाही इशारा त्यांनी दिलाय.