सांगलीत व्यापाऱ्यांचे ‘ भीक मागो’ आंदोलन ; लॉकडाऊनच्या निषेधार्थ भाजप आणि सर्व पक्षीय कृती समितीचाही पाठिंबा

कर्मचाऱ्यांचे पगार, विविध कर, बँकांच्या कर्जाचे हप्ते, घरखर्च कसा करायचा असा यक्ष प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे आता हे खर्च भागविण्यासाठी नाईलाजाने भीक मांगो आंदोलन करावे लागत आहे.

    गली: गेल्या वर्षी पासून वारंवार वाढत जाणाऱ्या लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या व्यापाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सांगलीत ‘भीक मांगो’ आंदोलन केले. लॉकडाऊन उठवायचा नसेल तर शासनाने कर्मचारी पगार, वीजबिल, घरपट्टी, पाणीपट्टी, घरखर्च, कर्जाचे हप्ते भागविण्यासाठी व्यापाऱ्यांना भीक द्यावी, अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली. व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांच्या नेतृत्वाखाली बालाजी चौक ते टिळक चौक रस्त्यावर मानवी साखळी करण्यात आली होती. भाजपसह सर्व पक्षीय कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी झाले होते.

    महापुरापासून आधीच व्यापारी पेठा ओस पडल्या आहेत, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या १०० दिवसापासून व्यापार बंद आहे. कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजना करूनही रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने लॉकडाऊनचा कालावधी सतत वाढत आहे. यामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. असे मत शहा यांनी व्यक्त केले

    कर्मचाऱ्यांचे पगार, विविध कर, बँकांच्या कर्जाचे हप्ते, घरखर्च कसा करायचा असा यक्ष प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे आता हे खर्च भागविण्यासाठी नाईलाजाने भीक मांगो आंदोलन करावे लागत आहे. आंदोलनात अनेक व्यापारी संघटनाचे पदाधिकारी, व्यापारी, माजी आमदार नितीन शिंदे, सर्व पक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर, युवा नेते पृथ्वीराज पवार,नगरसेवक धीरज सूर्यवंशी, युवराज बावडेकर, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, भाजपचे अमर पडळकर आदी उपस्थित होते.