ग्रामीण पाणीपुरवठ्याचे वीज कनेक्शन तोडल्यास खबरदार; आमदार अनिल बाबर यांचा इशारा

    सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महावितरण कंपनीने गावोगावी पाणी पुरवठा योजनांचे वीज कनेक्शन तोडण्याच्या सूचना मागे न घेतल्यास शासनाकडे याबाबत पाठपुरावा करू. पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे गावोगावी पाण्यासाठी गर्दी वाढून कोरनाचा प्रसार वाढल्यास, त्यासाठी महावितरणच्या पुणे, मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही शासनाकडे करू, असा इशारा आमदार अनिल बाबर यांनी दिला आहे.

    याबाबत आमदार अनिल बाबर यांनी दिलेली माहिती अशी, एका बाजूला कोरोनाचा कहर वाढत आहे. अशावेळी शासन आणि प्रशासन नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करीत आहे. मात्र, त्याचवेळी महावितरण कंपनीच्या पुणे-मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थकीत वीज बिलासाठी ग्रामपंचायतींच्या नळ पाणीपुरवठा योजनांची वीज कनेक्शन तोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे ग्रामपंचायतींचे पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन बंद झाल्यास गावोगावी पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

    साहाजिकच पाहण्यासाठी गावोगावी नागरिकांची झुंबड उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका अधिक आहे. ही वस्तुस्थिती पुणे, मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे. एकीकडे लोकांना गर्दी करु नका, असे सांगायचे आणि दुसरीकडे पाणीपुरवठ्याचे वीज कनेक्शन तोडायचे आणि गर्दी होण्याची शक्यता निर्माण करायची, हे धोरण बरोबर नाही. दुसरीकडे कोरोनामुळे ग्रामपंचायतीचे अर्थकारण बिघडले आहे. वसुलीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. ही बाब आपण शासनाच्या निदर्शनास आणून देणार आहोत. स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

    राज्यातील जनता अगोदरच कोरोनाच्या संसर्गजन्य साथीने हैराण आहे. अशात महावितरणच्या धोरणाने लोक अधिक हैराण होतील. याबाबतच्या सूचना महावितरण कंपनीने मागे न घेतल्यास प्रसंगी शासनाकडे याबाबत पाठपुरावा करू. पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे गावोगावी पाण्यासाठी गर्दी वाढून कोरोनाचा प्रसार वाढल्यास त्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे लागेल, असे घडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही शासनाकडे करू, असा इशारा आमदार अनिल बाबर यांनी दिला.