जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा स्वबळाचा नारा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी समन्वयक म्हणून माजी आमदार विलासराव जगताप व शिवाजीराव नाईक यांची निवड करण्यात आली आहे. इच्छुकांनी सोमवारपर्यन्त पक्षाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.

  सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक (Sangli District Bank Elections) बिनविरोध करण्याचा कुठलाही प्रस्ताव अथवा चर्चा नाही. जिल्हा बँकेच्या सर्व 21 जागा भाजप स्वबळावर लढणार आहे. कोअर कमिटीने याबाबत आज एकमताने निर्णय घेतला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

  सांगलीत जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक वाढवण्याबाबत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, दिनकर पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पवार, निता केळकर, मकरंद देशपांडे, रमेश शेंडगे, सुरेश आवटी, मिलिंद कोरे, सुरेंद्र चौगुले आदी उपस्थित होते.

  भाजपच्या बैठकीत जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय सर्व नेत्यांनी एकमताने घेतला आहे. बँकेच्या सर्व 21 जागांचा अभ्यास आम्ही केला आहे. याबाबत गेले काही दिवस आम्ही माहिती घेत होतो. त्यानुसार आज बैठकीत निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला असल्याचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सांगितले.

  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. त्यांनी तुमच्या स्तरावर निर्णय घ्या अशी सूचना केली. त्यानुसार आज बैठकीत निर्णय घेतला. निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. भाजपाची प्रत्येक तालुक्यात चांगली ताकद आहे. निवडणूक बिनविरोध करण्याचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. भविष्यात असा प्रस्ताव आल्यास कोअर कमिटीमध्ये त्यावर निर्णय घेतला जाईल.

  जिल्हा बँकेसाठी नाईक, जगताप समन्वयक

  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी समन्वयक म्हणून माजी आमदार विलासराव जगताप व शिवाजीराव नाईक यांची निवड करण्यात आली आहे. इच्छुकांनी सोमवारपर्यन्त पक्षाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.