भटक्या कुत्र्यांसाठी कोंडवाडा निर्माण करा; भाजप महिला मोर्चाची मागणी

    सांगली : महापालिका क्षेत्रात सुमारे २० ते २२ हजार भटकी कुत्री व जनावरे आहेत. ही कुत्री दिवसेंदिवस हिंसक बनत आहेत. नागरिकांकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची सतत मागणी केली जाते. मात्र, महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

    महापालिकेच्या मालकीच्या एखाद्या जागेवर भटक्या कुत्र्यांसाठी कोंडवाडा निर्माण करण्याची गरज आहे. त्याचे नियोजन करावे, अशी मागणी भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा नगरसेविका ऍड. स्वाती शिंदे यांनी केली. नगरसेविका गितांजली ढोपे-पाटील, सविता मदने, उर्मिला बेलवलकर यांच्यासह ऍड. शिंदे यांनी आज आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन दिले.