“चहा साठी काय पण..!” कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला झाली तल्लफ, पोहचला शेजाऱ्याच्या घरी

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा चहाची तलफ भागवण्यासाठी चक्क केंद्रापासून ५०० मिटर दूर असलेल्या शेजारच्या घरी गेला. ही घटना जेव्हा माहिती झाली त्यावेळी परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.

    सांगली: चहा हे पेय अनेकांना इतकं प्रिय आहे की, चहासाठी लोक काय करतील आणि कोणत्या थराला जातील याची कल्पना आपण न केलेली बरी. अशीच एक घटना ही वाळवा तालुक्यातील कामेरी येथील कोरोना विलगिकरण कक्षामध्ये घडली आहे. येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा चहाची तलफ भागवण्यासाठी चक्क केंद्रापासून ५०० मिटर दूर असलेल्या शेजारच्या घरी गेला. ही घटना जेव्हा माहिती झाली त्यावेळी परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.

    कामेरीत ९० रुग्ण ऍक्टक्टिव
    कामेरी गावातील पॉझिटिव्ह रुग्णांचा सार्वजनिक ठिकाणांवरील वावर वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाची एवढी दशहत असताना या रुग्णांना त्याचे काहीच गांभीर्य नाही. आत्तापर्यंत येथील सहा जणांनी प्राण गमावले आहेत. दुसऱ्या लाटेतील जवळजवळ ९० च्यावर रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. या वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे गावात काही रुग्ण होम क्वारंटाईन केले आहेत. तर काहींना येथील जिल्हा परिषद शाळेतील विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

    कोरोना पॉझिटिव्ह गेला किराणा माल खरेदीसाठी
    एक रुग्ण चार दिवसांपूर्वी डोके दुखू लागल्याने मेडिकलमध्ये औषधी खरेदीसाठी गेला. होम क्वारटांईन असलेला एकजण किराणा माल खरेदीसाठी गेला होता. तर काही होम क्वारटांईन रुग्ण रस्त्यावर फिरत आहेत. यासाठी कोरोना समिती कार्यरत आहे, मात्र या सर्व सदस्यांना मोठी डोकेदुखी झाली आहे. वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी गावात पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.