अखेर नीटचे सांगलीसाठी केंद्र मंजूर; ॲड. अमित शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

    सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : नीट परीक्षेसाठी सांगलीला केंद्र देण्याबाबत ॲड. अमित शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, सांगलीसाठी नीटचे केंद्र मंजूर झाले आहे. यासाठी केलेल्या मागणी व पाठपुराव्याबाबत पालक व प्राध्यापकांच्या वतीने ॲड. अमित शिंदे यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.

    नीटचे केंद्र सांगलीमध्ये झाल्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. याबाबत ॲड. अमित शिंदे व डॅा. विशाल मगदूम यांनी सांगलीला नीटचे केंद्र करण्याबाबत मागणी करत त्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केलेला होता. एनटीएच्या वतीने देशामध्ये नीटच्या परिक्षा घेतल्या जातात.

    एमबीबीएस, बीडीएस सोबतच आयुष कोर्सेस, व्हेटरनरीच्या संपूर्ण देशांतील १५ टक्क्याचा कोटा त्याचसोबत शासकीय, अनुदानित व खाजगी महाविद्यालयातील बीपीटिएच, बीपीओ, बीएएसपीएल, बीएससी नर्सिंग च्या प्रवेशासाठी नीट परिक्षा देणे आवश्यक आहे. सांगली जिल्ह्यामध्ये ८ इंजिनियरिंग, ३ एमबीबीएस, २ बीडीएस, ३ बीएएमएस, ३ बीएचएमएस तसेच फार्मसी, आर्किटेक्चर महाविद्यालये आहेत. अनेक महत्त्वाच्या परिक्षा सांगली जिल्ह्यामध्ये घेतल्या जातात. जिल्हात १४८ महाविद्यालये असून सांगली जिल्ह्यामधून परिक्षा देणार्या विद्यार्थांना शेजारच्या कोल्हापूर जिल्हामध्ये परिक्षेस जाते लागते. कोविडमुळे मागील वर्षी अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी आल्या होत्या.

    यावर्षी जिल्ह्यातून दहा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी या परिक्षेस बसतील असा अंदाज आहे. तसेच सांगली शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा विचार केला असता जवळपास वीस हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी सांगली हे केंद्र सोयीचे ठरणार आहे.

    यावेळी महालिंग हेगडे, जयंत जाधव, ॲड. अरूणा शिंदे, प्रा. योगेश पाटील, संभाजी पोळ, किरण एरंडोले, प्रा. रोहित कुंभारकर उपस्थित होते.

    खासदार संजय पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली

    यावेळी बोलताना ॲड अमित शिंदे म्हणाले की, हे केंद्र करण्याच्या मागणीकडे खासदार संजयकाका पाटील यांनी गांभीर्याने लक्ष दिल्याने व त्यासाठी पत्रव्यवहार करून केंद्रीयमंत्र्यांशी संपर्क साधल्याने हा निर्णय होवू शकलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा वतीने खासदार संजयकाका पाटील, माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे व एनटीए चे संचालक यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. याबाबत पालकांच्या वतीने खासदारांचा सत्कार करणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.