बारावीनंतर व्यवसाय अभ्यासक्रमासाठी जुलैमध्ये सीईटी : उदय सामंत

  सांगली : कोरोनाच्या साथीमुळे दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. अशा परिस्थितीत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात आली आहे. बारावीनंतरच्या व्यवसाय अभ्यासक्रमासाठी जुलैमध्ये सीईटी परीक्षा घेतली जाईल, त्याचा निकाल ऑगस्टमध्ये लागेल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगलीत दिली. जिल्ह्यात योग्य नियोजन केल्याने कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेनेच्यावतीने १४ व्हेंटिलेटर वाटप व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात मागील चार महिन्यांपासून फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत मोठा फैलाव झाला. दहावी-बारावीच्या परीक्षा जाहीर झाल्यावर रुग्ण वाढले, कोरोनाचा वाढती संख्या लक्षात घेऊन दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या परिस्थितीत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात आली आहे.

  बारावीनंतरच्या व्यवसाय अभ्यासक्रम महत्वाचा असतो. त्याच्यावरच विद्यार्थ्यांचे करिअर घडते. व्यवसाय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जुलैमध्ये सीईटी परीक्षा घेतली जाईल, त्याचा निकाल ऑगस्टमध्ये लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असा प्रयत्न आहे. त्यांना थेट पॉलिटेक्निकला प्रवेश देण्यात येईल. तसेच कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याबाबत खबरदारी शासनाने घेतली आहे.

  राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या अडीच हजारापर्यंत गेली होती. जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे अडीच हजार आवरून ६०० पर्यंत रुग्ण संख्या कमी झाली. आरोग्य महसूल पोलीस सरपंच आणि लोकप्रतिनिधींनी हातात हात घालून काम केल्यामुळे दुसरी लाट रोखण्यात यश आले. त्यामुळे जिल्ह्याच्या जनतेचे मुख्यमंत्र्यांच्या वतीने आभार मानत असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. येत्या काही महिन्यांमध्ये तोरणाची येण्याचा संभाव्य धोका आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्ह्याने आतापासून उपाययोजना कराव्यात असे आवाहन यावेळी केले.

  मागील महिन्यात आलेल्या तोंते वादळाच्या तडाख्याने कोकणात मोठे नुकसान झाले. या वादळामध्ये महाराष्ट्र सोबत गुजरातचेही नुकसान झाले मात्र यावेळी पंतप्रधानांनी गुजरातची हवाई पाहणी करून गुजरातला तात्काळ एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मात्र महाराष्ट्राला त्याच्या एक रूपायाही दिला नाही. त्यामुळे केंद्राकडून महाराष्ट्राबाबत दुजाभाव जात असल्याचे स्पष्ट दिसते. मात्र महाराष्ट्र सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा चौपट मदत केली. राज्य सरकारने २५२ कोटी रुपयांची तात्काळ मदत केली. वादळानंतर २० दिवसांनी केंद्रीय पथक कोकणचे पाहणी करण्यासाठी आले होते. पाहणी करण्यापेक्षा माशांवर कशाची केली असा आरोप त्यांनी केला.

  नाणार प्रकल्प यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी रद्द केला आहे. तो प्रकल्प होणार नाही. प्रकल्प रद्द केल्यामुळे शिवसेनेला त्याचा फटका बसणार, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. मात्र चार महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये बहुतांशी ग्रामपंचायतीतील शिवसेनेने जिंकल्या आहेत. त्यामुळे तेथील लोक सेनेच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले.

  सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन मशीन

  सांगली, मिरज शहर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात. त्यामुळे तेथे अधिकाधिक सुविधा मिळाल्या पाहिजेत. सांगलीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन मशीन घेण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकार्‍यांना केल्या. याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी सिटीस्कॅन मशिन घेण्याबाबत चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.