सांगलीत पाऊस अन् पुन्हा सतर्कतेचा इशारा; ‘हे’ धरण भरले पूर्ण, आता…

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. पाणलोट क्षेत्रातुन ११२८९ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.

    शिराळा / विजय पाटील : चांदोलीत पावसाची संततधार सुरूच असून, गेल्या २४ तासात ५० मिलीमीटर तर दिवसभरात २ मिलीमीटर पाऊस झाला. एकूण २६४७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून ७८१६ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणातील पाणीसाठा सकाळी आठपर्यंत ३४.१७ टीएमसी झाला आहे. धरण ९९.१३ टक्के भरले आहे.

    शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. चांदोली धरण परिसरात २१ जुलै ते २७ जुलै या सात दिवसांत ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीत धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढला. मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू केला अन पुरस्थितीती निर्माण झाली.२७ जूलै पर्यंत दोन हजार मिलीमीटर पाऊस झाला. त्यानंतर हळूहळू पावसाने जोर कमी केला. कमी-अधिक प्रमाणात जुलैअखेर संततधार होतीच. पण गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली. चार दिवस तर उन्हाळ्यात उन्हाचा चटका जाणवतो तशी परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाने ओढ दिल्याने माळामुरडाची पिके धोक्यात आली होती. पण पुन्हा गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू झाल्याने पिकाना जीवदान मिळाले.

    धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. पाणलोट क्षेत्रातुन ११२८९ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. ३४.४० टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणा-या या धरणात बुधवारी सकाळी आठ वाजता ३४.१७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ९९.१३ टक्के धरण भरले आहे. तब्बल चौदा दिवसानंतर ५०० क्युसेक विसर्ग मंगळवारी दुपारी तीननंतर सुरू केला होता. तो वाढवून २०५७ क्युसेक केला आहे.पावसाने असाच जोर वाढवला तर केव्हाही धरणातून पुन्हा विसर्गात वाढ होवू शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.