आरक्षणाबाबत राज्य सरकार घेतंय झोपेचे सोंग; चंद्रकांत पाटलांची टीका

  सांगली : राज्यातील महाविकास आघाडीच्या शासनाने मराठा आरक्षणामध्ये चालढकल, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा किचकट केला आहे. तर पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा घोळ घातला आहे. सर्व ठिकाणी राज्य शासनाकडे पर्याय असूनही, राज्य सरकारसारखं केंद्राकडे बोट दाखवून केवळ झोपेचं सोंग घेत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

  दिवंगत नेते नानासाहेब महाडिक यांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमासाठी आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर चंद्रकांत पाटील होते. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, निलेश राणे उपस्थित होते.

  चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा समाजाला मागास म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण मिळवून दिले. मात्र, यामध्ये महाविकास आघाडीने दुर्लक्ष केलं. आता देखील चालढकल सुरू आहे. मराठा आरक्षणाबाबत अजूनही न्यायालयात याचिका दाखल केली नाही. ज्या सवलती देण्यास आता पर्याय नाही, त्यादेखील दिल्या जात नाहीत. मेडिकलचे आरक्षणासाठी राज्य शासनाने महाविद्यालयांचा मॅनेजमेंट कोटा विकत घेऊन पर्यायी आरक्षण द्यावे. यासाठी कोणाचीही अडचण असायचे कारण नाही. आता पुन्हा मराठा समाजाला समाज मागास असल्याचे राज्य शासनाला कागदपत्री सिद्ध करावे लागेल. त्यासाठी समिती गठीत करावी लागेल. मात्र, यामध्ये अजून कोणतीही हालचाल नाही.

  आम्ही संभाजी महाराजांसोबत

  खासदार संभाजी महाराज यांनी नेतृत्व करावे, त्यांच्या आम्ही नेहमीच सोबत आहोत, त्यांना मान्य नसले तरी, ते कागदोपत्री भाजपचेच खासदार आहेत, पण त्यांनी धरसोडपणा सोडून नेतृत्व करावे. एकदा काय करायचे आहे, ते एकदा ठरवावे. अनेकदा भूमिका बदलल्या आहेत.

  सरकारच्या चालढकलपणामुळे आरक्षणाचा मुद्दा बनला किचकट

  ओबीसी आरक्षणाचा देखील मुद्दा केवळ सरकारच्या चालढकलपणामुळे किचकट बनला आहे. हा मुद्दा सोडवल्याशिवाय राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ शकणार नाहीत. सर्व ओबीसी लोकसंख्या सिद्ध केल्याशिवाय आरक्षण प्रश्न सुटणार नाही. राज्य शासनाने हा प्रश्न सोडवल्याशिवाय राज्यात एक निवडणूक घेऊन दाखवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं