अलकुड एमआयडीसीचे काम मार्गी लावा; शिवसेनेची उद्योगमंत्र्यांकडे मागणी

    सांगली : तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात कोणतेही उद्योग नसल्यामुळे अनेक तरुणांना नोकरीसाठी पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये स्थलांतरित व्हावे लागते. १५ वर्षांपूर्वी आर. आर. पाटील यांच्या काळात प्रस्तावित करण्यात आलेली अलकुड येथील एमआयडीसी मार्गी लावण्याची मागणी शिवसेनेचे नेते संदीप गिड्डे पाटील यांनी उद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

    अलकुड (ता. कवठेमहांकाळ) येथे १५ वर्षापूर्वी एम. आय. डी. सी. जाहीर झाली. मात्र, अद्याप कोणतीही प्रक्रिया झाली नाही. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात रोजगार संधी उपलब्ध करून देणारा एकही उद्योग सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे युवकांना रोजगारासाठी पुणे, मुंबई याठिकाणी स्थलांतरित व्हावे लागत आहे. यामुळे अलकूड, (ता. कवठेमहांकाळ) येथील प्रस्तावित एम. आय. डी. सी. चा प्रश्न मार्गी लागल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

    याबाबत प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करावी, अशी विनंती गिड्डे पाटील यांनी केली आहे. यावर लवरच स्थानिक लोकप्रतिनिधींसह बैठकीचे आयोजन करू, असे आश्वासन मंत्री देसाई यांनी दिले आहे.