देश आणि संविधान धोक्यात : नाना पटोले

  सांगली : सध्या संविधान व देश दोन्ही धोक्यात आले आहेत. देशात जे लोक सत्तेवर आहेत, ते संविधानाचा भंग करीत देश विकायला निघाले आहेत. त्यामुळे देश आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसला साथ द्या. २०२४ मध्ये देशाची व राज्याची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात द्या, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

  येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम यांचा सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मोहनराव कदम यांचा सत्कार काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाला. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल, काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील उपस्थित होते.

  पटोले म्हणाले, डॉ. पतंगराव कदम व मोहनराव कदम म्हणजे राम- लक्ष्मणाची जोडी होती. डॉ. पतंगराव कदम यांनी शासनाच्या योजना येथे आणल्या आणि मोहनराव कदम यांनी त्या राबविल्या विश्वजित कदम हे व्हिजन असलेले नेते आहेत.

  एच. के. पाटील म्हणाले, काँग्रेसला पडत्या काळात सावरण्याचे काम मोहनराव कदम यांनी केले. जिल्ह्यात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विश्वजीत कदम, विशाल पाटील आणि विक्रम सावंत यांनी एकदिलाने काम करावे.

  मंत्री सतेज पाटील म्हणाले, मोहनराव कदम यांचे काँग्रेस पक्षात बहुआयामी योगदान आहे. डॉ. पतंगराव कदम यांचा वारसा ना. विश्वजीत कदम समर्थपणे चालवत आहेत. कृषी व सहकार राज्यमंत्री ना. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, मोहनराव कदम आयुष्यभर शेतकरी व सामान्यांमध्ये रमले. त्यादृष्टीने हा सोहळा कोविडच्या पार्श्वभूमीवर कमी लोकांमध्ये होत आहे. परंतु यासाठी दिगग्ज नेते लाभले हे आपले भाग्य आहे. परंतु ही परिस्थिती निवळल्यानंतर लाखो लोकांच्या उपस्थितीत मोहनराव कदम यांचा सत्कार करू.

  यावेळी बाळकृष्ण यादव बाळासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त केले. सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, काँग्रेस नेते महेंद्र लाड, युवा नेते जितेश कदम, मंगेश चव्हाण सौरभ पाटील उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक आमदार विक्रम सावंत यांनी केले. आभार सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मानले.

  पुढील निवडणुकात विजय निश्चित : विशाल पाटील

  विशाल पाटील म्हणाले, आमदार मोहनराव कदम यांचे पक्षात मोठे योगदान आहे. माझ्याकडून बऱ्याच चुका झाल्या, परंतु त्या सर्व चुका त्यांनी माफ केल्या आहेत. मी, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम व आ. विक्रम सावंत एकत्र येवून पक्ष वाढीसाठी काम करणार आहोत. आता जिल्ह्याचे कडेगाव सांगली आणि जत हे तिन्ही कोपरे जोडले गेले आहेत. त्यामुळे यापुढे प्रत्येक निवडणुकीत विजय हा निश्चित आहे.

  मोहनराव कदम यांचे काम आदर्शवत: चव्हाण

  पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोहनराव कदम यांनी केलेले काम खूप मोठे आहे. सांगली- विधानपरिषद मतदारसंघात काँग्रेसकडे संख्याबळ कमी होते. तरीसुद्धा त्यांनी विजय मिळविला. पण तो विजय त्यांच्या कामाचा, परिश्रमाचा आणि जनसंपर्काचा होता. १९७८ मध्ये काँग्रेसचे विभाजन झाले, त्यावेळी काँग्रेसचे ते एकमेव जिल्हा परिषद सदस्य होते.