सांगलीत वाढतोय कोरोनाचा संसर्ग; आता पुन्हा लॉकडाऊन !

  सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्ह्यातील १७४ गावांत कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. या गावांत ये-जा करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. तसेच व्यापार व वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्यात येणार आहेत. या आदेशाची अंमलबजावणी पोलिस, महसूल, जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रशासनाने सुरू केली आहे. आदेशाचा भंग केल्यास पोलिसांना कडक कारवाई करण्यास सांगितले आहे. आज रविवारपासून पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत.

  जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरणे अवघड झाले आहे. दिवसेंदिवस रुग्ण व बळींचा संख्या वाढतच चालली आहे. सांगली, मिरज शहरासह वाळवा, कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यातील रुग्ण कमी होत नाहीत. जिल्ह्यातील दररोजच्या रुग्णांचा आकडा एक हजारच्या आसपास स्थिर आहे. यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १०.६२ टक्क्यांच्या आसपास आहे.

  जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढतीये

  राज्यात इतरत्र कोरोना कमी होत असताना सांगली जिल्ह्यात मात्र लाट वाढतच चालली आहे, याची गंभीर दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली. त्यामुळे शासनाने नेमकी परिस्थिती काय आहे, याची पाहणी करण्यासाठी तज्ज्ञांची पथके पाठविली होती. त्यानुसार गुरुवारी राज्य शासनाचे पथक पाहणी करण्यासाठी आले होते. तसेच केंद्राच्या आरोग्य पथकानेही शुक्रवारी सांगली शहरासह काही गावांना भेट दिली. या दोन्ही पथकांतील अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या यंत्रणेतील अनेक त्रुटी दाखवून दिल्या तसेच संसर्ग कमी होण्यासाठी काय करावे, याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने अंमलबजावणी सुरू केली आहे.

  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी तातडीने सर्व प्रांत, तहसीलदार, बीडीओ यांना रुग्णसंख्या जादा असलेल्या गावांत कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित ग्रामपंचायतींना तसे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायतींनीही तसे आदेश काढून गावात ठिकठिकाणी लावले आहेत.

  वाढता संसर्ग पाहता कडक पावले उचलणे गरजेचे

  ‘जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी प्रशासनाला कडक पावले उचलणे भाग आहे. जादा संसर्ग असलेल्या गावांत लॉकडाऊन कडक केला जाणार आहे. यासाठी महसूल व पोलिसांची मदत घेणार आहे. काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्राम दक्षता समितीवर राहणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कोरोना कमी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे; अन्यथा यापेक्षा कडक धोरण अवलंबण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

  – जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली