सांगलीत कृष्णा काठावर पुन्हा मगरीचे दर्शन; तब्बल १३ फूट लांब

    सांगली : भिलवडी ते सांगलवाडी या कृष्णानदी पट्ट्यामध्ये अजस्त्र मगरींचा नेहमीच वावर असतो. या मगरींच्या दहशतीमुळे कृष्णा नदीवर जाण्यास कुणीही धजावत नाही. चार दिवसांपूर्वी बिबट्याच्या दर्शनानंतर सांगलवाडी जवळ कृष्णानदीमध्ये सुमारे १३ फूट अजस्त्र मगरीने दर्शन दिल्याने कृष्णाकाठावर पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगलीवाडीकडून ही मगर कसबे डिग्रजकडे गेली आहे.

    कृष्णा नदीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अजस्त्र मगरींचा अधिवास आहे. या मगरीच्या हल्ल्यांमध्ये अनेकांचा जीव गेला आहे, तर कित्येकजण जखमी झाले आहेत. पाळीव प्राण्यांनाही या मगरींच्या हल्ल्यामुळे जीव गमवावा लागलेला आहे. कृष्णा नदीमध्ये मगरींचे वारंवार दर्शन घडत असल्याने नागरिक नेहमीच जीव मुठीत घेऊन जातात. मंगळवारी दुपारच्या सुमारास सांगलवाडी येथील नवीन पुलाशेजारी असणाऱ्या पोट मळीमध्ये अजस्त्र मगर विसावा घेत असल्याचे दिसून आले. बराच वेळ ही मगर पोट मळीमध्ये पडून होती. नागरिकांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर या परिसरामध्ये मगरीला पाहण्यासाठी गर्दी झाली.