‘समाजजीवनाचा, चळवळींचा अभ्यास असणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड’ डॉक्टर गेल ऑम्व्हेट यांचे निधन

  आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समाज शास्त्रज्ञ, डॉक्टर भारत पाटणकर यांच्या पत्नी डॉक्टर गेल ऑम्व्हेट यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःख निधन झाले. त्यांच्यावर गुरुवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कासेगाव जिल्हा सांगली येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

  मुळच्या अमेरिकन असलेल्या डॉक्टर गेल यांनी भातता येऊन श्रमिक मुक्ती दलाची स्थापना केली. त्या बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचार,  संत साहित्य आणि वारकरी तत्वज्ञानाच्या संशोधक -लेखिका असून डॉक्टर गेल यांनी या साहित्याची नव्या पद्धतीची मांडणी करून ती समाजापुढे आणली. परित्यक्ता स्त्रियांची चळवळ, आदिवासी चळवळीत त्यांनी झपाटल्या सारखे काम केले आहे.

  दरम्यान, डॉक्टर गेल यांच्या निधनाबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला असून “डॉ गेल या मूळच्या अमेरिकेच्या,पण फुले-आंबेडकर अभ्यासताना त्या भारतात आल्या आणि इथल्या मातीशी एकरुप झाल्या. भावपूर्ण श्रद्धांजली.” अशा आशयाचं ट्वीट केलं आहे.

  नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

  आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ,श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या, बुद्ध-फुले-आंबेडकर-मार्क्स यांच्या तत्वज्ञानाच्या अभ्यासक डॉक्टर गेल ऑम्व्हेट यांचे निधन झाले. डॉक्टर गेल या मूळच्या अमेरिकेच्या, पण फुले-आंबेडकर अभ्यासताना त्या भारतात आल्या आणि इथल्या मातीशी एकरुप झाल्या.

  त्यांनी लिहिलेली ‘दलित अॅंड डेमोक्रॅटिक रिव्हॉल्यूशन’, ‘वुई शॅल स्मॅश धिस प्रिझन : इंडियन वूमन इन स्ट्रगल’, ‘सोशल मुव्हमेंटस् अॅंड द सोशॅलिस्ट ट्रॅडीशन इन इंडीया’ ही व इतर पुस्तके ही भारतीय समाजव्यवस्थेचा अभ्यासपूर्ण आढावा घेणारी, व्यवस्थेला अंतर्मुख करणारी अशीच आहेत.

  यावर्षी २२ जानेवारी रोजी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. गेल आणि भारतजी पाटणकर यांची भेट हा नेहमीच वेगळा अनुभव असतो. आता यापुढे गेल भेटणार नाहीत याचे दुःख आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय समाजजीवनाचा, चळवळींचा अभ्यास असणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.

  या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण भारतजी व त्यांच्या कुटुंबीयांच्या सोबत आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.