सांगली बाजार समितीचे विभाजन करा; संदीप गिड्डेंची सहकारमंत्र्यांकडे मागणी

    सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करा, अशी मागणी शिवसेना नेते संदीप गिड्डे यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.

    कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगलीच्या विभाजनाचा प्रश्न गेली अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. यामुळे कवठेमंकाळ व जत तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी अनेक अडचणी येत आहेत. या संदर्भात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून कवठेमंकाळ तालुक्यासाठी वेगळी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन केल्यास कवठेमंकाळ येथील पशुधन बाजार आणखी मजबूत होऊ शकतो, याशिवाय डाळिंब, तेलबिया यांचे सौदे सुरू करता येऊ शकतात, तालुक्यातील विविध ठिकाणी उपबाजार आवार उभारणी करता येऊ शकते.

    कवठेमंकाळ तालुक्यातील नागज सारख्या ठिकाणी बेदाणा प्रक्रियेचा विस्तार पाहता बेदाणा प्रक्रियेसाठी लागणाऱ्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देता येऊ शकतात. या मागणीचे निवेदन गिड्डे यांनी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना दिले. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले असल्याचे गिड्डे यांनी सांगितले.