दुर्देवी घटना! बंधाऱ्यातील वाहत्या पाण्यात पडलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तीन भावंडांचा बुडून मृत्यू

घाणंद येथील विजय व आनंदा व्हनमाने या दोन सख्ख्या भावासह चुलत भाऊ अंकुश व्हनमाने हे तिघे रविवारी सायंकाळपासून बंधाऱ्याच्या पाण्यात गायब झाले होते. ही माहिती मिळताच सांगलीतील विश्वकर्मा बोट क्लबच्या सदस्यांनी शोध मोहीम राबवली. आज सकाळी तिघांचेही मृतदेह हाती लागले.

  सांगली : सांगली येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. तीन भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. बंधाऱ्यातील वाहत्या पाण्यात पडलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात पट्टीचे पोहणाऱ्या तीन भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. ही घटना आटपाडी तालुक्यातील घाणंद येथे घडली. रविवारी पाण्यात बेपत्ता झालेल्या तीन भावंडांचे मृतदेह सोमवारी सकाळी बचाव पथकाच्या हाती लागल्यानंतर कुटुंबासह गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले.

  घाणंद येथील विजय व आनंदा व्हनमाने या दोन सख्ख्या भावासह चुलत भाऊ अंकुश व्हनमाने हे तिघे रविवारी सायंकाळपासून बंधाऱ्याच्या पाण्यात गायब झाले होते. ही माहिती मिळताच सांगलीतील विश्वकर्मा बोट क्लबच्या सदस्यांनी शोध मोहीम राबवली. आज सकाळी तिघांचेही मृतदेह हाती लागले.

  रविवारी दुपारी तीन वाजता घरातील कुत्रे सोबत घेऊन मासेमारीसाठी विजय व आनंदा अंकुश व्हनमाने हे सख्खे भाऊ आणि त्यांचा चुलत भाऊ वैभव लहू व्हनमाने बंधाऱ्यावर गेले होते. तिघांचेही वय १५ ते १७ वर्ष होते. सायंकाळी सहा पर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. रात्री आठ वाजता घाणंद तलावातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या कालव्या लगत विजय आणि आनंदा यांचे कपडे आणि चप्पल सापडल्या. त्यांच्यासोबत नेलेल्या कुत्र्याचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात सापडला.

  गावकऱ्यांनी पोलीस आणि महसूल प्रशासनाला माहिती कळवली. रात्री साडेआठ वाजता तहसीलदार सचिन मुळीक, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस आणि ग्रामस्थांनी पाण्यात बराच वेळ शोधाशोध केली. मात्र पाण्याचा प्रवाह जादा असल्याने मुलांचा तपास लागला नाही.
  मात्र दुसऱ्या दिवशी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. विश्वकर्मा फौंडेशन बोट क्लबचा सदस्य गजानन नरळे यांने पुढाकार घेत या तिन्ही मुलांचे पार्थिव पाण्याबाहेर काढले.

  मासेमारीसाठी गेलेल्या भावंडांचा लाडका कुत्रा पाण्याच्या प्रवाहात पडल्याने त्याला काढण्यासाठी या तिघेही पाण्यात उतरले होते. पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने पट्टीचे पोहणारे असलेले तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोघांचे पार्थिव तर एकमेकांना मिठी मारलेल्या स्थितीत आढळले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.