कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेची स्थापना

    सांगली : सद्यस्थितीत कोविड रूग्णांचे जिल्ह्यातील वाढते प्रमाण लक्षात घेता, शासकीय व खाजगी रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन वापराव्या लागणाऱ्या रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. ऑक्सिजन देण्यासाठी सिलेंडर आणि कॉन्सन्ट्रेटर मशीन या दोन प्रणालीचा उपयोग सध्या केला जात आहे. काही कोविड रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर देखील वैद्यकिय ऑक्सिजन उपचाराची गरज भासते. हे वैद्यकीय उपचार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनव्दारे घरी देखील दिले जाऊ शकतात. अशा रूग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिनचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. यासाठी तालुकास्तरावर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेची स्थापना करण्यात आली आहे.

    ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन हवेतील ऑक्सिजन घेऊन त्याचे शुध्दीकरण करून रूग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देत असल्यामुळे त्यास सिलेंडरची गरज भासत नाही. त्यामुळे अशा मशिन हॉस्पीटल अथवा घरगुती वापर या दोन्ही ठिकाणी वापरल्या जाऊ शकतात. ऑक्सिजन उपचारासाठी रूग्णाला रूग्णालयात दाखल न होता घरीच ऑक्सिजनची उपलब्धता होऊ शकते. यासाठी तालुकास्तरावर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेची स्थापना करण्यात आली आहे. पंचायत समिती गटविकास अधिकारी हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेचे नोडल अधिकारी आहेत. तालुकास्तरावर स्थापित ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेचे कार्यवाह प्रमुख हे वैद्यकिय अधिक्षक आहेत.

    ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन बँकेचा रुग्णांच्या नातेवाईक यांनी लाभ घ्यावा. यातून घरी ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना याचा लाभ होईल. याचा गरजू रूग्णानी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.