इथेनॉल तयार करणाऱ्या कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली, ऊसाला योग्य भाव मिळण्याची शक्यता

इथेनॉल तयार करणाऱ्या कारखाणन्याची आर्थिक स्थिती चांगली, ऊसाला योग्य भाव मिळणार असल्याने, हंगामात ऊस कारखानदार आणि ऊस उत्पादक याच्यामध्ये संघर्ष कमी होण्याची शक्यता

    सांगली जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांची दररोज तीन लाख ६० हजार लिटर इथेनॉल उत्पादनाची क्षमता झाली आहे. उसाचा रस, बी हेवी मोलॅसिस आणि साध्या मोलॅसिसपासून इथेनॉल तयार करीत आहेत. पाच वर्षांत कारखान्यांनी दुपटीने इथेनॉल उत्पादन वाढविले आहे. इथेनॉलकडे कल वाढल्यामुळे येत्या हंगामात साखरेचे उत्पादन घटणार आहे, मात्र इथेनॉल निर्मितमुळं राज्यातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली झाली आहे. त्यामुळे स्वतः साखर कारखानदार देखील आता ऊसाला ठरलेला भाव द्यायला आम्ही तयार असल्याचं कबूल करत आहेत. त्यामुळे, यंदाच्या हंगामात ऊस कारखानदार आणि ऊस उत्पादक याच्यातील संघर्ष कमी होण्याची शक्यता आहे.

    महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण दहा टक्क्यांपर्यंत करण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे. २०२३ पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण २० टक्क्यांपर्यंत करण्याचे केंद्र शासनाने उद्दिष्ट आहे. मागणी आणि साखरेच्या दराची घसरण लक्षात घेऊन जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे.

    “साखरेला इथेनॉलचा उत्तम पर्याय ठरत आहे. उसाच्या साखरेचे दर आणि एफआरपीचा विचार करता कारखाने आर्थिक अडचणीत जात असतात मात्र, इथेनॉल करणारे कारखानेही व्यवस्थित चालू शकतील. केंद्र सरकारने इथेनॉलबाबत चांगला निर्णय घेतला आहे. साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती केल्यास, शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला चांगला दर देता येणार आहे.”

    असं मत राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी व्यक्त केले आहे.

    इथेनॉल करणारे कारखाने कारखाना रोजची क्षमता लिटरमध्ये :-

    राजारामबापू – १,५०,०००

    क्रांती  – ९०,०००

    सोनहिरा – ६०,०००

    हुतात्मा – ३०,०००

    उदगिरी – ३०,०००

    श्री श्री रवीशंकर – ५०,०००

    राजारामबापू कारखान्याचे साखराळे युनिट प्रतिदिन ७५ हजार लिटर इथेनॉल तयार करत आहे. येत्या हंगामापासून ते दीड लाख लिटरवर जाईल. क्रांती कारखान्याचे ९० हजार लिटर, सोनहिरा कारखान्याचे ६० हजार लिटर इथेनॉलची उद्दिष्ट असून कंपन्यांच्या मागणीनुसार उत्पादन सुरू आहे. हुतात्मा, उदगिरी शुगर या कारखान्यांची प्रतिदिन ३० हजार लिटरची क्षमता असून, तेही येत्या हंगामात पूर्ण क्षमतेने उत्पादन घेणार आहेत. राजेवाडी (ता.खानापूर) येथील श्री श्री रवीशंकर या कारखान्यानेही दररोज ५० हजार लिटर इथेनॉल उत्पादनाचा निर्णय घेतला आहे.

    “साखर कारखानादार नेहमी साखरेच्या दराच्या आर्थिक गणितावर उसाला भाव ठरवत असतात. मात्र इथेनॉल सारख्या उपपदार्थमुळे साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली होत आहे. आता तरी शेतकऱ्यांना ज्यास्त भाव दयावा.” अशी अपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

    गेल्यावर्षी उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिसपासून ७७ टक्के इथेनॉल तयार केले आहे. येत्या हंगामामध्ये इथेनॉलसाठी उसाच्या रसाचा कारखानदार वापर करणार आहेत. रसापासूनच्या इथेनॉलला प्रतिलिटर ६२ रुपये ६५ पैसे दर मिळत आहे.