संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानमध्ये फूट ; ‘या’ निलंबित कार्यवाहकाने केली ‘शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’ संघटनेची स्थापना

संघटनेतील काही जणांना हे काम सहन न झाल्याने त्यांनी माझ्यावर आरोप सुरू केले. माझी बदनामी सुरूच ठेवताना त्यांनी शिवप्रतिष्ठानमधून निलंबन केले. संघटनेतून निलंबित केले तरी कार्यकर्त्यांच्या मनातून कोणीही निलंबित करू शकत नाही- नितीन चौगुले

    संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानमध्ये फूट पडली असून, शिवप्रतिष्ठानमधील निलंबित नितीन चौगुले यांनी मेळावा घेत ‘शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’ या नव्या संघटनेची घोषणा केली, राजकारणविरहित हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच या संघटनेकडून राज्यभर काम केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
    शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांना शिवप्रतिष्ठानमधून निलंबित करण्यात आले होते, शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी याबाबतची माहिती दिली होती, तेव्हापासून चौगुले यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. शहरातील माधवनगर रोडवर असलेल्या डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यात चौगुले यांनी आपली भूमिका मांडत नव्या संघटनेची घोषणा केली.

    चौगुले म्हणाले की, गुरुजीं आदेशानुसार वीस वर्षापासून शिवप्रतिष्ठानमध्ये काम करत आलो आहे, कोणतीही अपेक्षा न ठेवता भिडे यांनी दिलेले कार्य करत आलो, या कालावधीत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शिवप्रतिष्ठानचे काम वाढवले. २०१३ पासून पूर्णवेळ काम करताना गडकोट मोहिमेसह सर्व उपक्रम प्रभावीपण राबवले, भिडे यांनीही पूर्ण विश्वास व्यक्त केल्याने चांगले काम करू शकलो, मात्र संघटनेतील काही जणांना हे काम सहन न झाल्याने त्यांनी माझ्यावर आरोप सुरू केले. माझी बदनामी सुरूच ठेवताना त्यांनी शिवप्रतिष्ठानमधून निलंबन केले. संघटनेतून निलंबित केले तरी कार्यकर्त्यांच्या मनातून कोणीही निलंबित करू शकत नाही असं त्यांनी म्हटलं.

    गुरुजींबद्दल आदर कायम असेल
    शिवप्रतिष्ठानमधून निलंबित करण्यात आले असले तरी संभाजी भिडे यांच्याविषयी आदर कायम असणार आहे, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच नवीन संघटनेचे काम असणार आहे, राजकारणविरहित कामास प्राधान्य देणार असल्याची माहिती नितीन चौगुले यांनी दिली.