…म्हणून आमदार पडळकर यांच्यासह चार जणांवर विटा पोलिसात गुन्हा दाखल

    सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बेकायदेशीर गर्दी जमवल्याप्रकरणी भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह चौघांविरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बानूरगड ( ता.खानापूर) येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारक भूमिपूजन कार्यक्रमात गर्दी केल्याप्रकरणी हा गुन्हा प्रशासनाकडून दाखल करण्यात आला आहे.

    सोमवारी (दि. १९) बाणूरगड (जि. सांगली) येथे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सदाभाऊ खोत होते. हा कार्यक्रम सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करुन झाला.

    तसेच बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाच्या ठिकाणी अंदाजे १५० ते १७० लोक उपस्थित होते. त्यामुळे बाणूर गडचे सरपंच सज्जन बाबर, निलेश नेताजी पाटील (रा. खंबाळे (भा)), आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर या चौघांविरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद विट्याचे नायब तहसीलदार चेतन कोनकर यांनी दाखल केली आहे.