मोठी बातमी ! भाजपच्या ‘या’ आमदारावर गुन्हा दाखल

सर्वोच्च न्यायालयाकडून बैलगाडी शर्यतीसाठी बंदी आदेश असताना देखील नियोजित मैदानामध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते.

  सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सर्वोच्च न्यायालयाकडून बैलगाडी शर्यतीबाबतचा बंदी आदेश असताना देखील आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी २० ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता झरे ते पारेकरवाडी या रोडलगत असले नियोजित मैदानामध्ये बैलगाडा/छकडा शर्यतीचे आयोजन केले होते. ही बैलगाडा शर्यत होऊ नये यासाठी महसूल तसेच पोलीस प्रशासन यांनी गोपीचंद पडळकर यांचे मनपरीवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच ही शर्यती होऊ नये, म्हणून संचारबंदी आदेश लागू केले होते. तरी देखील बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याने आमदार पडळकर यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  बैलगाडा शर्यत आयोजकांना बैलगाडी शर्यती घेऊ नये म्हणून  नोटीस बजावणी केलेली असताना तसेच कोविड १९ चे अनुषंगाने पारित करण्यांत आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच जिल्हाधिकारी सांगली यांचे संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करुन त्या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासह बेकायदेशीर विनापरवाना सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचा भंग करुन कोणत्याही प्रकारे बैलगाडी शर्यतीसंदर्भात परवानगी न घेता तसेच बैलगाडी शर्यती संदर्भात नियम, नियमावली ठेऊन सदस्य नोंदणी करुन त्यांना बक्षिस जाहिर केले.

  तसेच बैलगाडी शर्यतीचे रितसर आयोजन न करता केवळ आपण सर्वसामान्यांमध्ये सोशल मीडियाद्वारे बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले. झरे गावी बैलगाडी शर्यती घेणार अशा केलेल्या वक्तव्यास दुजोरा देण्यासाठी परस्पर काही बैलगाड्या बोलावून नियोजित ठिकाणीखेरीज वाक्षेवाडी गट नंबर ३१९-१/२ या जागेमध्ये त्यांनी बैलगाड्या पळवून शर्यती घेतल्या आहेत. त्यामुळे आता गोपीचंद पडळकर व त्यांचे इतर ४० कार्यकर्ते यांच्यावर आटपाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला आहे.

  जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिले पोलीस प्रशासनाला आदेश

  “बैलगाडा शर्यतीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनामार्फत जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात शर्यतीचं आयोजन होणार होतं, ते झालेलं नाही, परंतु आमच्याकडे काही रिपोर्ट्स आलेत, त्यानुसार चार-पाच बैलगाड्यांनी शर्यतीत भाग घेतला. या संबंधी सांगलीच्या पोलीस अधिक्षकांशी माझं बोलणं झालेलं आहे. याची संपूर्ण सखोल चौकशी करुन याविषयी संबंधितांवर कायदेशी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत”, अशी प्रतिक्रिया सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

  ती शर्यत शेतकऱ्यांनी घेतली, पडलकरांचा दावा

  “काही शेतकऱ्यांनी, बैलगाडा चालक मालकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली असल्याचं आम्हाला प्रसारमाध्यमांतून कळत आहे. आम्ही आणखी त्या ठिकाणी गेलेलो नाही. झरे गावात मोठा पोलिस फौजफाटा होता. कायदा आणि सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने आम्हाला विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान आम्ही दिला. पण आता आम्हाला काही शेतकऱ्यांनी स्पर्धा पार पाडली आहे, अशी माहिती कळतीय” असे पडळकर यावेळी म्हणाले.

  …अन् शर्यत पार पडली

  झरे गावात बैलगाडा शर्यत पार पडणार होती. मात्र, पोलिसांनी गावच्या मुख्य मैदानाची धावपट्टीच उखडून टाकली होती. त्यानंतर मात्र पडळकर समर्थकांनी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास तिथूनच पाच किमी अंतरावर दुसऱ्या एका मैदानात धावपट्टी तयार केली आणि पुढच्या काही तासांत तिथे स्पर्धा भरवली.या शर्यतीत पाच ते सहा बैलगाडा चालक आणि मालक सहभागी झाले होते. तसंच ही स्पर्धा पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यानिमित्ताने पडळकर समर्थकांनी पोलिस आणि प्रशासनाला मोठा गुंगारा दिल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांना गाफील ठेऊन ही शर्यत पार पडली.