जतच्या माजी आमदारावर कर्नाटकात गुन्हा

    सांगली : जतचे माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांच्याविरुद्ध कर्नाटकातील विजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उमदी पोलिसांनी झिरो पद्धतीने हा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने रविवारी सकाळी अकरा वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे.

    माजी आमदार विलासराव जगताप यांचे पुतणे मुरलीधर सुब्रराव जगताप यांना दोन दिवसांपूर्वी जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्यावर सध्या सांगली येथे उपचार सुरू आहेत. उमदी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याच प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, याप्रकरणी करे यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. नेमका काय फिर्याद आहे हे सांगण्यास उमदी पोलिसांनी नकार दिला असून, शून्य पद्धतीने हा गुन्हा कर्नाटकातील विजापूर हद्दीत घडला असल्याने तेथे वर्ग करण्यात आल्याचे उमदी पोलिसांनी सांगितले.

    विजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उमदी पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हा वर्ग केला असून, त्यांच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी अकरा वाजता भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष संग्रामसिंह जगताप यांनी सांगितले.

    राजकीय दबावातून गुन्हा दाखल : जगताप

    याप्रकरणी माजी आमदार विलासराव जगताप यांच्याशी संपर्क साधला असता माझ्यावर नियोजनबद्ध राजकीय दबाबातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला जशास तसे उत्तर देणार असून शनिवारी याप्रकरणी आपली भूमिका आंदोलनस्थळी जाहीर करणार असल्याचे सांगितले.