दुबईतील कंपनीकडून सांगलीतील द्राक्ष व्यापाऱ्याची फसवणूक; तब्बल १.३६ कोटींचा गंडा

फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुबई येथे भेट दिली असता तेथील कार्यालय बंद असल्याचे लक्षात आले. यातील एक संशयित हा पाकिस्तानमध्ये फरार झाला असल्याची माहिती त्यांना मिळाली.

  सांगली : येथील द्राक्ष आणि डाळिंब निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यास दुबईतील कंपनीने एक कोटी ३६ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी दुबई, पाकिस्तानातील कंपनीच्या दोन मालकांसह मुंबईतील दोघा कर्मचाऱ्यांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौर्णिमा विजय पाटील (वय ४२, रा. उत्तर शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली.

  दुबईतील ओपीसी फूडस्टफ ट्रेडिंग एलएलसी कंपनीचा मालक मुहम्मद फारूक, बद्र अहमद जुमा हुसेन (रा. दुबई) या दोघांसह मुंबईतील व्यवस्थापक दिलीप जोशी (मुंबई),व्यवस्थापक माजीद जलाल (रा. दुबई), अर्थसहाय्य प्रमुख मंगेश गांगुर्डे (मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

  पोलिसांनी सांगितले, पाटील यांची पीव्हीआयपी एक्सपोर्ट एलएलपी नावाची आयात निर्यात करणारी कंपनी आहे. ते द्राक्ष, डाळिंब, नारळ, तांदूळ मालाची खरेदी करून निर्यात करतात. २०१९ मध्ये दुबईतील ओपीसी फूडस्टफ कंपनीचा पर्चेस ऑफिसर माजीद जलाल याने पाटील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून मालाची चौकशी केली. त्यावेळी पौर्णिमा यांनी कंपनीविषयी माहिती दिली. दिलीप जोशी हा मुंबई परिसरासाठी काम पहात असल्याचे जलाल याने सांगितले. त्यानंतर पौर्णिमा यांनी पतीसह डिसेंबर २०१९ मध्ये जोशी याची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी संशयित गांगुर्डे हा भारतातील काम पाहत असल्याने त्यावेळी ओळख झाली. त्यानंतर फिर्यादी हे मजीद जलाल आणि कंपनीला भेट देण्यासाठी दुबईला गेले.

  त्यावेळी कंपनीचा मालक मुहम्मद फारूक, बद्र अहमद हुसेन यांची ओळख झाली. माल निर्यातीसाठी पन्नास टक्के रक्कम आगाऊ व मालाचे कंटेनर ‘युएई’मध्ये मिळाल्याने उर्वरित रक्कम देण्याचा व्यवहार ठरला. त्यानुसार जानेवारी २०२१ मध्ये ऑर्डर मिळाली. त्यानुसार द्राक्षाचे चार आणि डाळिंबाचे तीन असे सात कंटेनर निर्यात केले. त्याची रक्कम एक कोटी ५७ लाख रुपये होते. त्यावेळी तीस टक्के रक्कम फिर्यादी यांना देण्यात आली. उर्वरित रक्कमेसाठी जलाल याच्याशी संपर्क केले.

  त्यानंतर त्यांनी अमेरिकन डॉलरमध्ये पैसे बँक खात्यावर पाठवल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात पैसे आले नाहीत. संशयिताने चालढकलपणा करण्यास सुरूवात केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार दुबईतील कंपनीच्या दोघा मालकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

  संशयिताचे दुबईतील कार्यालय बंद

  फिर्यादी पाटील यांनी निर्यात सुरु करण्याअगोदर संशयिताच्या दुबई येथील कार्यालयात भेट दिली होती. खात्री झाल्यामुळे ते येथून शेतमालाची निर्यात करीत होते. फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुबई येथे भेट दिली असता तेथील कार्यालय बंद असल्याचे लक्षात आले. यातील एक संशयित हा पाकिस्तानमध्ये फरार झाला असल्याची माहिती त्यांना मिळाली.