महिला बालकल्याण सभापतीपदी गीतांजली ढोपे-पाटील, समाजकल्याण सभापतीपदी सुब्राव मद्रासी बिनविरोध

-सांगली महापालिका सभापती निवडीत आघाडीची माघार

  सांगली : महापालिकेच्या महिला बालकल्याण तसेच व समाजकल्याण दोन्ही समित्यांची सभापतीपदे भाजपने राखली. महिला बालकल्याण सभापतीपदी गीतांजली ढोपे- पाटील निवडून आल्या. समाजकल्याण सुब्राव मद्रासी यांची बिनविरोध निवड झाली. महिला व बालकल्याण सभापती निवडणुकीत भाजपच्या ढोपे-पाटील व काँग्रेसच्या शुभांगी साळुंखे यांना समसमान मते पडली. त्यामुळे चिठ्या टाकण्यात आल्या. चिठ्ठीत ढोपे- पाटील यांचे नाव आले, त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

  समाजकल्याण सभापती पदासाठी भाजपचे सुबराव मद्रासी व काँग्रेस-राष्ट्रवाद आघाडीचे उमेदवार योगेंद्र थोरात सभापतीपदी (राष्ट्रवादी) हे निवडणूक रिंगणात होते. थोरात यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपच्या मद्रासी यांना बिनविरोध निवडून आल्याचे पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी घोषित केले. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी काम पाहिले, तर आयुक्त नितीन कापडणीस, उपयुक्त राहुल रोकडे, उपयुक्त चंद्रकांत आडके उपस्थित होते.

  समसमान मते, चिट्ठी टाकून निर्णय

  महिला व बालकल्याण समितीमध्ये १६ सदस्य आहेत, त्यापैकी ढोपे पाटील यांना आठ तर काँग्रेसच्या शुभांगी पाटील यांना आठ मते पडली, त्यानंतर समसमान मते पडल्याने चिट्ठी टाकण्यात आली, ज्यामध्ये गीतांजली ढोपे पाटील यांचे नाव आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

  भाजपच्या नासीमा नाईक आघाडी सोबत

  महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या नासीमा नाईक यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्याया उमेदवारांना मतदान केलं होतं, आज सभापती निवडीत देखील त्यांनी आघाडी सोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याने भाजप व आघाडीच्याया उमेदवारांना समसमान मते पडली, मात्र चिट्ठीने साथ दिल्याने भाजपच्या पारड्यात सभापती पद पडले आहे.