राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज सांगली जिल्हा दौऱ्यावर

दीपाली भोसले सय्यद यांच्या चॅरिटेबल ट्रस्ट दत्तक घेतलेल्या मुलींना प्रत्येकी ५० हजार रुपये ठेव पावत्यांचे वितरण कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे.

  सांगली : राज्यपाल (Governor of Maharashtra) भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) गुरुवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दीपाली भोसले सय्यद यांच्या चॅरिटेबल ट्रस्ट दत्तक घेतलेल्या मुलींना प्रत्येकी ५० हजार रुपये ठेव पावत्यांचे वितरण कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे.

  यावेळी प्रतिकात्मक स्वरुपात सांगली- कोल्हापूर जिल्ह्यातील पाच मुलींना पावत्या वितरित केल्या जाणार आहेत. कवठेपिरान रस्त्यावरील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता कार्यक्रम होणार आहे, ट्रस्टच्या प्रमुख अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद यांनी ही माहिती दिली.

  त्या म्हणाल्या, सन २०१९ मध्ये पूरग्रस्त भागातील एक हजार मुलींना या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दत्तक घेतले. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ४८ गावांतील या मुली आहेत. त्यांच्या लग्नाच्या मदतीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची देण्याची घोषणा केली होती. यासाठी गरजू, सामान्य कुटुंबातील मुली निवडण्यात आल्या होत्या. त्यातील १०० मुलींच्या लग्नावेळी यापूर्वीच प्रत्येकी ५० हजार रुपये दिले आहेत.

  केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री जयंत पाटील, शिवसेना नेते नितीन बानुगडे-पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय पाटील उपस्थित राहणार आहेत. कलाकार व त्यांना मदत करणाऱ्यांना सरकारने मदत करावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

  मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती

  कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी प्रतिकात्मक पाच विवाहित मुलींना ठेवपावत्या दिल्या जातील. अन्य मुलींना घरी प्रमाणपत्र पोहोच केली जाणार आहेत. कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन सहभागी होणार आहेत. जुलैमधील महापुरात घरे गमावलेल्यांसाठीही मदत देण्यात येणार आहे.

  कामाची वर्ल्ड बुकमध्ये नोंद

  दीपाली भोसले- सय्यद यांच्या या कामगिरीबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अशा पद्धतीने काम करणारी ही पहिलीच अभिनेत्री आहे. या कामगिरीबद्दल राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.