जानेवारीनंतर जोरदार द्राक्ष हंगाम, कमी उत्पादनामुळे चांगला भाव मिळण्याची आशा

यंदा सुमारे ३० टक्के द्राक्षबागांना खराब हवामानाचा फटका बसलाय. त्यामुळे द्राक्षांचे दर चढे राहतील, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. मात्र सर्व माल एकाचवेळी काढण्यात येत असल्यामुळे दलालांकडून दर पाडण्यात येतील, अशी भीतीही काही द्राक्ष उत्पादक व्यक्त करत आहेत.

सांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला सुरुवात होतेय. लिंगनूर, सावळज, कोंगनोळी, पळसी या परिसरातील काही द्राक्ष प्लॉट विक्रीसाठी तयार होत आहेत. काही ठिकाणी तर काढणीलादेखील सुरुवात झालीय.

द्राक्षांच्या चार किलोच्या पेटीचा दर सध्या ३५० ते ४२० रुपये एवढा आहे. जानेवारीनंतर जोरदार हंगाम अपेक्षित असून अधिक चांगला दर मिळेल, अशी बागायतदारांना अपेक्षा आहे.

हवामानातील बदलांमुळे बागायतदारांसमोर दरवर्षी नवनवी संकटे उभी राहत असतात. गेली दोन वर्षे होणारा मुसळधार पाऊस, त्यानंतरचा अवकाळी पाऊस, मग थंडी आणि पुन्हा अवकाळी पाऊस या बिघडलेल्या निसर्गचक्राचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातही मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांची लागवड झालेली आहे. पुढील ८ ते १० दिवसांत या तालुक्यातील जवळपास सर्व बागा विक्रीसाठी तयार होतील, अशी अपेक्षा आहे.

यंदा सुमारे ३० टक्के द्राक्षबागांना खराब हवामानाचा फटका बसलाय. त्यामुळे द्राक्षांचे दर चढे राहतील, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. मात्र सर्व माल एकाचवेळी काढण्यात येत असल्यामुळे दलालांकडून दर पाडण्यात येतील, अशी भीतीही काही द्राक्ष उत्पादक व्यक्त करत आहेत.

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याच्या चर्चेमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र सध्या तरी अशी परिस्थिती दिसत नसल्यामुळे द्राक्ष उत्पादक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळालाय.