चांदोली धरणात अतिवृष्टी; धरणातील पाणीसाठा दीड टीएमसीने वाढला

    सांगली : चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस झाला. गेल्या २४ तासात १८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे इथे अतिवृष्टी होत आहे. तर पाथरपुंज येथे ३२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. २४ तासांत दीड टीएमसीने धरणातील पाणीसाठा वाढला आहे.

    सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरण परिसर पावसाचे आगार समजले जाते. येथे वार्षिक चार ते पाच हजार मिलीमीटर पाऊस पडतो. गेल्यावर्षी पाटण तालुक्यातील पाथरपुंज येथे चेरापुंजीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. यंदाही पाथरपुंज येथे गेल्या २४ तासांत ३२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

    चांदोली धरणात पाथरपुंज पासूनच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक होत असते. पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस पडत आहे. पाणलोट क्षेत्रातून सध्या १९ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. विसर्ग ही वाढवला आहे. १ हजार ५३३ क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू आहे.ओढ्यानाल्याचे पाणी व धरणातील पाणी यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. चांदोली धरणाच्या पाण्याची पातळी ६०३.४० मिटर झाली आहे तर पाणी साठा १५.१२ टीएमसी असून त्यांची टक्के वारी ४३.९५ अशी आहे. गेल्या २४ तासात १८५ मिलीमीटर पावसासह एकूण २८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरूच आहे. असाच पावसाचा जोर वाढत राहिल्यास धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढणार आहे.

    गेल्या २४ तासांत दीड टीएमसीने धरणातील पाणीसाठा वाढला. तर पाणीपातळी १.१० मीटरने वाढली आहे. चांदोली धरण परिसरातील संततधार पावसाने डोंगर दऱ्यातील धबधबे कोसळत आहेत. परिसर हिरवाईने नटला आहे. हवेत कमालीचा गारठा निर्माण झाला आहे.