सांगली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार ! एनडीआरएफची तुकडी दाखल

    सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आल्याने महापुराचा धोका निर्माण झाला आहे. नदी काठावरील गावांमध्ये स्थलांतर सुरू करण्ययात आले आहे. वाळवा तालुक्यातील शिगाव येथे बचाव पथकातील एनडीआरएफची एक तुकडी दाखल झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना दिली.

    जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस, महापौर दिग्विजय सूर्यवंशी उपमहापौर उमेश पाटील यांनी सांगली शहरातील मगरमच्छ कॉलनी येथे पूरग्रस्त नागरिकांची पाहणी केली, व नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन केले, महापालिका अधिकारी यांना स्थळांतरनासाठी नागरिकांना मदत करण्याच्या सूचना दिल्या.

    यंदा शंभर टक्के लोकांचे स्थलांतरण

    गेल्यावर्षी १०४ गावांना महापुराचा फटका बसला होता. सुमारे ४ लाख नागरिकांचे स्थलांतरण करावे लागले होते. महापुराचा जुना अनुभव लक्षात घेता, बोटींवर अजिबात अवलंबून राहणार नाही. पूर येण्यापूर्वीच शंभर टक्के नागरिकांचे स्थलांतरण करणार असल्याचे जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले.

    एनडीआरएफच्या तुकड्या मागवल्या

    जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, सध्या वाळवा तालुक्यातील शिगाव येथे एक एनडीआरएफची तुकडी दाखल झाली आहे. आणखी एक तुकडी येत आहे, तर शासनाकडून अजून चार तुकड्यांची मागणी आपण केली आहे. गेल्यावर्षी महापूर आल्यानंतर एनडीआरएफ तुकड्या येण्यास अडचणी आल्या होत्या, त्यामुळे यंदा आधीच तयारी केली आहे.