महाविकास आघाडीचा मी गुलाम नाही : राजू शेट्टी

-राज्य सरकारवर जोरदार टीका ; प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा

    वाळवा : जिथं महाविकास आघाडी सरकार चुकतंय, तिथं मी त्यांच्या विरोधात ठामपणे बोलणार. मी महाविकास आघाडीचा घटक आहे गुलाम नाही, अशी घणाघाती टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

    महाविकास आघाडी सरकार विरोधात पुरग्रस्तांच्या न्यायहक्कासाठी सर्व विरोधी पक्षाच्यावतीने प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या मोर्चाची सुरुवात कचेरी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन झाली. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील, पृथ्वीराज पवार, प्रसाद पाटील, शाकीर तांबोळी, महेश खराडे, संजय बेले, संदीप राजोबा, विजय पवार, ॲड.एस.यु.संदे, सनी खराडे, सतिश पवार, भागवत जाधव, संदीप जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

    शेट्टी पुढे म्हणाले, केंद्र सरकार राज्य सरकारला मदत देत नसेल, तर तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करा. स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या आंदोलनात तुमच्या बरोबर असेल. कोरोना, महापूर यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत ही अत्यंत तोकडी आहे. राज्य सरकार काटकसर करतय असं सांगत आहे. पण तसं दिसत नाही. मंत्र्यांची दालने सजत आहेत. गाडया घेत आहात, मग पुरग्रस्तांना द्यायला पैसे का नाहीत ? सरकारने महापूराचा कायमस्वरुपीचा तोडगा काढत धोरात्मक निर्णय घ्यावेत. अलमट्टीचा विसर्ग कमी- जास्त करून प्रश्न सुटत नाहीत. अशी टीका शेट्टी यांनी यावेळी केली.