सगळं गावच करील, तर सरकार काय करील ? आमदार गोपीचंद पडळकर यांचा सवाल. कोरोनामुक्त गाव स्पर्धेवर केली टीका

खरंतर या ५० लाखांच्या बक्षीसाबद्दलही साशंकता आहे. कारण ज्या पत्रकाराचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे, त्यांना जीआर काढून ५० लाखांची मदत करतो सांगणाऱ्यांनी एक रुपायाचीही मदत केलेली नाही. मृताच्या कुटुंबियांना साधी भेटही घेतलेली नाही. ही स्पर्धा म्हणजे अशाच ‘भूलथापांच्या मालिकेचा’ एक भाग आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन खुळं उगवलं’ अशी गत राज्यात करून ठेवली असल्याचा उपरोधिक टोलाही आमदार पडळकर यांनी लगावला आहे.

    सांगली : ‘सगळं गावच करील, तर सरकार काय करील?’ असा सवाल करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून करोनामुक्त गाव ही स्पर्धा सुरू केली आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

    राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावीत, यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्याची घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल बुधवारी केली. यात प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख आणि १५ लाख रुपयांचे बक्षीस आणि तितकाच निधी देण्याचे त्यांनी म्हटले आहे. ही स्पर्धा राबवताना जे निकष दिले आहेत त्यात प्रत्येक ग्रामपंचायतीकडून ५ पथकांची स्थापना, प्रभागनिहाय कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष स्थापन करणे, शिवाय या स्पर्धेसाठी कार्यवाही करणा ऱ्यापथकाची नेमणूक करणे, कोरोना तपासणीसाठी आणि रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहन चालकांचे पथक निर्माण करणे,तसेच कोव्हिड हेल्पलाईन पथक आणि लसीकरण पथकाची स्थापना करणे इत्यादी २२ गोष्टी गाव पातळीवर करायच्या आहेत.

    यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका करताना या बावीस गोष्टींसह सर्व निकष पूर्ण करताना या पथकांना आणि व्यवस्थापनेसाठी ‘निधी’ कोण देणार? ही बाब सरकारने सोयीस्करपणे अंधारात ठेवली आहे, असा आरोप केला. आधीच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोरोना आणि लॅाकडाऊनमुळे पूर्णपणे मोडला आहे, त्यात कित्येक घरातील काम करणारी माणसं मृत्यूमुखी पडली आहेत. लोकांचे अश्रू पुसण्याऐवजी स्पर्धा कसली भरवता? असा सवालही पडळकर यांनी केला आहे.

    ते पुढे म्हणाले की, खरंतर या ५० लाखांच्या बक्षीसाबद्दलही साशंकता आहे. कारण ज्या पत्रकाराचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे, त्यांना जीआर काढून ५० लाखांची मदत करतो सांगणाऱ्यांनी एक रुपायाचीही मदत केलेली नाही. मृताच्या कुटुंबियांना साधी भेटही घेतलेली नाही. ही स्पर्धा म्हणजे अशाच ‘भूलथापांच्या मालिकेचा’ एक भाग आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन खुळं उगवलं’ अशी गत राज्यात करून ठेवली असल्याचा उपरोधिक टोलाही आमदार पडळकर यांनी लगावला आहे.