‘माझी वसुंधरा’ अभियानात कवठेमहांकाळ नगरपंचायत राज्यात ११ वी

  सांगली : राज्य सरकारच्या “माझी वसुंधरा” अभियानात कवठेमहांकाळ नगरपंचायतीने संपूर्ण राज्यात ११ वा क्रमांक पटकावत सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. स्पर्धेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या यशाबद्दल सर्व स्तरातून नगरपंचायतीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  योजनेअंतर्गत पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश या निसर्गाशी संबधीत पंचतत्वावर केलेल्या कामासंदर्भात २ ऑक्टोंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत १५०० गुणांची ही स्पर्धा घेण्यात आली होती.

  ऊर्जेचा परिणामकारक वापर करणे, बचत करणे तसेच अपव्यय टाळणे या गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने “माझी वसुंधरा” हे अभियान राबवले होते.

  राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांनी या अभियानात सहभाग घेतला. यामध्ये ३९५ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश होता. तर २७२ ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी झाल्या होत्या.

  नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत ४३ महानगरपालिका २२६ नगरपरिषदा तर १२६ नगरपंचायती अभियानात सहभागी झालेल्या होत्या. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था गटातून १० हजार पेक्षाजास्त लोकसंख्या असलेल्या २४६ ग्रामपंचायतींनी अभियानात सहभाग घेतला होता.

  रायगड, रत्नागिरी व गोंदीया जिल्ह्यात १० हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती नसल्याने पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या २६ ग्रामपंचायती अभियानात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये १२६ नगरपंचायतीमध्ये राज्यात ११ व्या क्रमांकाचा मान कवठेमहांकाळ नगरपंचायतीला मिळाला.