ठेवींचा वापर विकासकामांसाठी करून स्थावर वाढविली

    सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडे असणाऱ्या ३८ कोटींच्या ठेवींना बँकेत व्याज कमी मिळत होते. त्यामुळे सांगली, मिरज, कवठेमहांकाळ येथील बाजार समिती आवारात कोट्यवधींची विकासकामे केली आहेत. यातून समितीची स्थावर मालमत्ता वाढून त्याची किंमत ठेवीपेक्षा चौपट झाली आहे. समितीला वर्षाला कोट्यवधींचे उत्पन्न मिळणार आहे, असे प्रत्युत्तर समितीचे सभापती दिनकर पाटील, संचालक सर्वश्री कुमार पाटील, अण्णासाहेब कोरे, वसंतराव गायकवाड, जीवन पाटील, बाळासाहेब बंडगर, प्रशांत शेजाळ, अजित बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिले.

    ते म्हणाले, काहीजणांनी सावळीच्या जमिनी खरेदीबाबत केलेले आरोप खोटे आहेत. त्यांनीच पूर्वी ही जमीन जादा दराने खरेदी करण्यासाठी करार केला होता. पण आम्ही तो हाणून पाडला. त्यांच्या करारापेक्षा आम्ही जमीन प्रतिएकर १२ लाखांनी स्वस्त घेतली. त्यातून समितीचे सुमारे एक कोटी ६० लाख वाचले आहेत. हीच पोटदुखी त्यांना आहे.

    संचालकांनी माहिती दिली, की समितीच्या विस्तारासाठी सावळीत १६ एकर जमीन १२ कोटींना घेतली. तिथे पाच कोटींचे रस्ते, संरक्षक भिंत बांधली. मिरज बाजार आवारात सहा कोटींचे शॉपिंग सेंटर, चार कोटींचे कोल्ड स्टोअरेज उभे केले आहे. ७८ लाखांतून जनावरांसाठी कट्टे तयार केले आहेत. ४० लाखांचे फूल मार्केट बांधले आहे.

    कवठेमहांकाळला समिती आवारात ८५ लाखांचा हॉल, ४० लाखांचे रस्ते, १ कोटींचे शॉपिंग कॉम्पलेक्स बांधले. ढालगावमध्ये ३० लाखांचे रस्ते केले. जतमध्ये डाळिंब खरेदी-विक्रीसाठी १ कोटी ८६ लाखांचा हॉल उभा केला आहे. जतमध्ये बाजार समितीत भाजीपाला मार्केट, शेतकरी निवास, गोडाऊनसाठी १ कोटी २५ लाख खर्च केले. उमदीत बाजार विकसित करण्यासाठी १८ एकर जमीन घेतली आहे.

    त्यांनी सांगितले की, ही सर्व कामे पुढील काही वर्षांचा विचार करून केली आहेत. यातून समितीचे उत्पन्न कायमचे सुरू होणार आहे. ही सर्व रक्कम ठेवीच्या व्याजापेक्षा कितीतरी अधिक पट होणार आहे, याचा साधा हिशोब आरोप करणाऱ्यांनी करू नये, हे दुर्दैवी आहे.

    ठेवीपोटी वसंतदादा बँकेच्या इमारतीची मागणी

    पाटील म्हणाले, वसंतदादा बँकेत बाजार समितीची दोन कोटी ८६ लाखांची ठेव अडकली आहे. त्यापोटी आम्ही मार्केटयार्डातील बँकेची इमारत ताब्यात देण्याची मागणी केली आहे. तसा प्रस्ताव तयार केला आहे. त्यावर चर्चा सुरू आहे. सर्वजण यासाठी सकारात्मक आहेत. लवकरच हा निर्णय होईल.