“जयंत पाटील यांनी सांगलीवरचा राग आता काढू नये, व्यापाऱ्यांना मुभा द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरू” ; पृथ्वीराज पवार यांचा इशारा

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर असताना राज्यातील प्रमुख मंत्री म्हणून जयंत पाटील यांनी कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक घेण्यास विरोध करायला हवा होता. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील वाळवा, कडेगाव परिसरात कोरोनाचा स्फोट झाला. वाळवा तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या दररोज सरासरी चारशेने वाढत असताना त्यांनी तालुक्यात तळ ठोकणे गरजेचे होते.

    सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाचे संकट मोठे आहे, हे मान्यच; पण त्यासाठी सांगलीची बाजारपेठ उद्‍ध्वस्त होत असताना आम्ही बघत बसणार नाही. पालकमंत्री जयंत पाटील यांचा सांगलीवरील राग आहे, तो आम्हाला मान्य आहे, पण या काळात त्यांनी तो बाजूला ठेवावा आणि नियमांचे पालन करून व्यापार सुरु करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी भाजप नेते, सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी आज केली.

    ते म्हणाले, “दररोज वाढत निघालेला लॉकडाऊन कुठेतरी थांबवा; व्यापारी, फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, फूल विक्रेते, फळ विक्रेते या गरीब घटकांना जगू द्या”, अशी मागणी करत शहरातील कापडपेठ, गणपती पेठ, मारुती रस्ता येथील व्यापाऱ्यांनी मानवी साखळी केली. सुरक्षित अंतर ठेवून, हातात फलक घेऊन राज्य सरकारला साकडे घालण्यात आले. पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. रिक्षावाले, चहावाले, मोठे शोरुमवालेही फलक घेवून उभे होते. लॉकडाऊन काळातील सर्व कर्जाचे व्याज माफ करावे, प्रोत्साहन अनुदान द्यावे, महापुरात मिळाली त्याप्रमाणे मदत मिळावी, महापालिका व पोलिसांनी केलेल्या दंडाची रक्कम परत मिळावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

    पृथ्वीराज पवार म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर असताना राज्यातील प्रमुख मंत्री म्हणून जयंत पाटील यांनी कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक घेण्यास विरोध करायला हवा होता. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील वाळवा, कडेगाव परिसरात कोरोनाचा स्फोट झाला. वाळवा तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या दररोज सरासरी चारशेने वाढत असताना त्यांनी तालुक्यात तळ ठोकणे गरजेचे होते. त्याऐवजी ते मराठवाड्याचा दौरा करून पक्ष वाढीचा कार्यक्रम राबवत राहिले आणि इकडे वाळवा तालुक्यातील संख्या जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या जवळपास 40 ते 45 टक्के आहे. समस्या वाळव्यात मोठी आहे, महापालिका क्षेत्रात रुग्ण संख्या कमी आहे, मग इथे निर्बंध कशासाठी? सांगली, मिरज शहरांसाठी विशेष बाब म्हणून परवानगी देणे आवश्यक होते. कोरोना संबंधीच्या उपाय योजना किंवा लॉकडाऊन हे कोणत्याही कायद्यानुसार राबवले जात नसून तो तारतम्याचा आणि सद्‍सदविवेकबुद्धीचा भाग असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.