जयंत पाटलांनी जिल्ह्याचा निधी वाळव्याला पळवला : गोपीचंद पडळकर

जिल्हा नियोजन मंडळ हे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे मंडळ आहे. त्यातून जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा ठरविला जातो. मात्र, या ठिकाणी जे मंत्री होतात, ते आपल्या तालुक्यात निधी पळवितात, मी आतापर्यंत जिल्ह्यात जिल्हा नियोजनाचा निधी कोणाकोणाला दिला, ही माहिती मागविली.

  सांगली : सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगली जिल्ह्याचा निधी स्वतःच्या वाळवा मतदारसंघात पळवला असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला. सांगली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर ते बोलत होते.

  आमदार पडळकर म्हणाले, जिल्हा नियोजन मंडळ हे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे मंडळ आहे. त्यातून जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा ठरविला जातो. मात्र, या ठिकाणी जे मंत्री होतात, ते आपल्या तालुक्यात निधी पळवितात, मी आतापर्यंत जिल्ह्यात जिल्हा नियोजनाचा निधी कोणाकोणाला दिला, ही माहिती मागविली. मात्र, ती देण्यास जिल्हा प्रशासन टाळाटाळ करत आहे. आतापर्यंत आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यांवर जिल्हा नियोजन समितीने अन्याय केला आहे, याबाबत जिल्ह्यातील जनतेने सुज्ञपणे विचार करावा.

  एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा दिवाळी नाही

  मी एस.टी.कर्मचाऱ्यांचे मेळावे घेत आहे. ज्या महामंडळाच्या माध्यमातून सरकारला कर मिळतो, त्या महामंडळातील कर्मचऱ्याना पगार मिळत नाहीत, तुटपुंजी पेन्शन मिळत आहे. त्यातून दर दोन दिवसातून कर्मचारी आत्महत्या होत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळ शासनात विलीन करून त्यांना राज्य कर्मचाऱ्यांचे सर्व देयके मिळावेत ही मागणी मान्य न केल्यास सरकारला दिवाळी-दसरा साजरा करू देणार नाही.

  असा केला दुजाभाव

  आमदार पडळकर म्हणाले, जिल्हा नियोजन मधून रस्ते विकासमधून पालकमंत्री ५ कोटी इतरांना १.३० कोटी, जनसुविधा : पालकमंत्री २ कोटी ५ लाख, राज्यमंत्री ५० लाख, खासदार संजयकाका पाटील ८० , खासदार धैर्यशील माने ४० लाख, आमदार ५५ लाख , विधान परिषद ३५ लाख, निमंत्रित सदस्य १५, शिक्षक आमदार यांना १८ लाख असा निधीचा दुजाभाव आहे.