अलमट्टीविषयी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी होणार चर्चा; जयंत पाटील घेणार भेट

    सांगली : अलमट्टी धरणातून पूरनियंत्रणाचे काम महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसे चांगले होईल यादृष्टीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी सकाळी बैठक होणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.

    जलसंपदा विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना घेऊन ही चर्चा होणार आहे. ही थेट चर्चा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी होणार आहे. कृष्णा नदीचा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचे नियोजन, महाराष्ट्रातल्या कृष्णा खोर्‍यातील व कर्नाटकच्या कृष्णा खोर्‍यातील जनतेला जे नुकसान सोसावे लागते, त्यापासून कमीत कमी कसे नुकसान होईल आणि पूरनियंत्रणाचे काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसे चांगले होईल यादृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे पाटील म्हणाले.

    दरम्यान, यापूर्वी सचिव स्तरावर बैठक झाली. आता मंत्री स्तरावर होत आहे. शेजारील राज्याशी संवाद चांगला कसा होईल यासाठी हा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले.