तुबचीबबलेश्वर पाण्याला कर्नाटकाचा विरोध : जयंत पाटील

  जत : जतच्या सीमेवरील गावांना तुबचीबबलेश्वर योजनेतून पाणी देण्यासाठी कर्नाटकाचा विरोध असून तालुक्यातील वंचित ६५ गावांसाठी वारणेतुन सहा टीएमसी पाणी देण्याचे आदेश दिले आहेत. या विस्तारित योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. विरोधक काहीही म्हणोत, मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन ही योजना पूर्ण करणारच असे प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाद्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

  संख (ता.जत) येथील राजारामबापू माद्यमिक प्रशालेत आयोजित केलेल्या शेतकरी मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, जत तालुक्यात मंत्री म्हणून नव्हे तर स्व. राजारामबापूचा मुलगा म्हणून येतो. राजारामबाचे जतच्या शेवटच्या टोकाला पाणी देण्याचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच जलसंपदा खाते घेतले आहे. बिळूरच्या दोऱ्यावेळी मी कानडीत भाषण केले होते. त्यावेळी तालुक्यातील ६५ गावांना पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे वारणेतुन सहा टीएमसी पाणी देण्याचे आदेश दिले आहेत. त्याला आर्थिक तरतूद करून ही विस्तारीत योजना पूर्ण करू.

  ते म्हणाले, जत तालुक्यातील कोणताही भाग पाण्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. मराठवाडा दौऱ्यानंतर ऑक्टोबर महिन्यात प्रत्येक जिल्हा परिषद गटाचा दौरा करणार आहे. त्यावेळी सर्व अडचणी जाणून घेऊ.
  यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील, माजी सभापती सुरेश शिंदे, माजी सभापती मन्सूर खतीब, जिल्हा अद्यक्ष अविनाश पाटील, तालुकाध्यक्ष रमेश पाटील, महिला अद्यक्ष कविता कोडग यांनी मनोगत व्यक्त केले.

  जत तालुक्यातील नेत्यांना कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत येण्याची विनंती केली की मी तुमचाच आहे, थोडे दिवस थांबा असे सांगत होते. वंचित गावांना पाणी दिला तरच तुमच्याबरोबर येऊ असा आग्रह येथील प्रमुख नेत्यांनी धरला होता, असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, दीड वर्षाची तपश्चर्या करून पाण्याचा ठोस निर्णय घेऊनच मी तुमच्यापर्यंत आलो आहे. आता पाणी देईपर्यंत स्वस्त बसणार नाही.

  माजी नगरसेवक मोहन उर्फ भैया कुलकर्णी यांनी जत शहराच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधले हा धागा पकडत मंत्री जयंत पाटील म्हणाले, सद्याच्या युवा पिढीकडे वेगळा दृष्टीकोण असून प्रभावीपणे काम करण्याची जिद्द असते, अशा युवा पिढीला बळ देण्याचे काम राष्ट्रवादी करेल.

  प्रकाश जमदाडे म्हणाले, विस्तारित योजनेला तातडीने गती द्यावी. जतच्या उत्तर भागातील नवाळवाडी, बेवणुर, वाळेखिंडी या गावाचा म्हैसाळ योजनेत समावेश करावा. तालुक्यात तहसीलदारासह अनेक अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत. मंत्री जयंत पाटील हेच तालुक्याला पाणी देऊ शकतात हा विश्वास असल्यानेच आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

  राष्ट्रवादीत दिग्गजांचा प्रवेश

  मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, माजी सभापती तथा केंद्रीय रेल्वे बोर्ड सोलापूर विभागाचे अध्यक्ष प्रकाश जमदाडे, माजी सभापती मन्सूर खतीब, माजी नगरसेवक मोहन उर्फ भैया कुलकर्णी, निलंबिका बसवेश्वर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब गडदे, माजी सभापती सुजाता पाटील, मार्केट कमिटीचे माजी सभापती देयगौडा बिरादार, पंचायत समितीचे माजी सदस्य साहेबराव टोणे, माजी सरपंच नसीर मुल्ला, प्रकाश व्हनमाने, योगेश व्हनमाने, दीपक चव्हाण, मेहबूब गवंडी, ईर्षाद खतीब, ऍडव्होकेट रणधीर कदम, अण्णासो जमदाडे, रघुवीर जमदाडे, आय एम बिरादार यांच्यासह उमदी, संख, मुचंडी, बिळूर, डफळापूर, शेगाव, बनाळी गटातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.