अलकुड एम गावात बिबट्याचा ठिय्या; वन विभागाकडून शोध मोहीम जारी

  सांगली : मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज गावात दिसलेल्या बिबट्याने त्याचा मोर्चा दुष्काळी टापूतील कवठेमहांकाळ तालुक्याकडे शुक्रवारी रात्री वळविला आहे. रविवारी दुपारी अलकुड (एम) गावामध्ये बिबट्याचे दर्शन झाले. दुपारपासून हा बिबट्या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या ऊसाच्या शेतात ठिय्या मारुन बसला आहे.

  वन विभागाने बिबट्याची शोधमोहीम हाती घेतली आहे. विभागाचे अधिकारी-कर्मचारी त्या ऊसाच्या शेताभोवती ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान बिबट्या आल्याची बातमी वा-याच्या वेगाने पसरल्याने तालुक्यात प्रचंड भितीचे असे वातावरण तयार झाले आहे. अलकुड एम गावातील अशिष पाटील, अनिकेत मंडले, विशाल मंडले आणि ॠषिकेश मंडले हे तरुण रविवारी दुपारी माने खो-यातील डोंगरात गेले होते. त्यावेळी त्यांना काही पाळीव कुत्री बिबट्याच्या पाठीमागे लागल्याचे दिसले. या तरुणांनी बिबट्या पळत गेलेल्या दिशेने धाव घेतली. यावेळी बिबट्या तुकाराम माने यांच्या ऊसाच्या फडात जाऊन बसला. बिबट्या दिसल्याची माहिती त्या तरुणांनी पोलिस पाटील राजाराम पाटील यांना दिली. याबाबत लगेच वन विभाग, पोलिस ठाणे आणि तहसीलदार कार्यालयास अलकुड एम गावामध्ये बिबट्या आल्याचे कळविण्यात आले.

  सहायक वनसंरक्षक विजय गोसावी, वन क्षेत्रपाल प्रकाश सुतार, तालुका वनरक्षक व्ही. के. कोळेकर, सागर थोरवत, वनपाल जितेंद्र चौगुले यांच्यासह वनमजूरांचे पथक तातडीने बिबट्या लपून बसलेल्या माने खोरा परिसरात दाखल झाले. सांगलीतून वन्य जीव रक्षक टीम सुध्दा दाखल झाली. सहायक पोलिस निरीक्षक अक्षय ठिकणे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला.

  वन विभागाने बिबट्या पहिल्यांदा पाहिलेल्या तरुणांच्या मदतीने शोध सुरु केला. पण बिबट्या लपून बसलेल्या ऊसाचे क्षेत्र चार ते पाच एकर असल्याने शोध कार्यात अडथळा निर्माण झाला होता. वन विभागाने तातडीने ऊसाच्या फडाला वेढा टाकून बिबट्याच्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही. रविवारी रात्री उशीरापर्यंत शोध मोहीम सुरु होती. परंतु, ऊसाच्या फडात ठिय्या मारुन बसलेला बिबट्याबाहेर आला नव्हता. तर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही ऊसाच्या फडाशेजारी ठाण मांडून बिबट्याच्या हालचाली टिपत होते.

  तालुक्यात बिबट्या आला आहे. या पार्श्वभूमीवर अलकुड एम गावाच्या शेजारील सर्व गावातील सरपंच आणि ग्रामसेवकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेली आहे. तर अलकुड एम येथील बिबट्या पकडण्यासाठी प्रशासन आणि वन विभागाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करुन शोधमोहीम सुरु ठेवली आहे.

  – बी. जे. गोरे, तहसीलदार, कवठेमहांकाळ.

  बिबट्या लपून बसलेले ऊसाचे क्षेत्र चार ते पाच एकर आहे. एवढ्या मोठ्या परिसरात शोध मोहीम बिबट्यास पकडणे आव्हानात्मक अशी गोष्ट आहे. आमचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र थांबून बिबट्याच्या हालचालीवर नजर ठेऊन आहेत. बिबट्या तेथून बाहेर पडताच त्याला पकडण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री तयार आहे……..

  – विजय गोसावी, सहायक वन संरक्षक.