सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढला; फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु

    सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सांगली शहरासह वाळवा तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत राहिल्याने पॉझिटिव्हीटी दर दहा टक्क्यांपेक्षा अधिक राहिला. चालू आठवड्यामध्येही जिल्ह्याचा चौथ्या टप्प्यात समावेश कायम आहे. या कारणांमुळे ब्रेक द चेनअंतर्गत चौथ्या टप्प्याच्या निर्बंधानुसार 12 जुलैपर्यंत कडक निर्बंध कायम राहणार आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य दुकाने आणि व्यवसाय बंदच राहणार आहेत.

    कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित क्षेत्रातील कोरोना पॉझिटीव्हीटीचा वेग आणि वापरात असलेल्या ऑक्सिजन सुविधायुक्त खाटा यांच्या आधारे लागू करण्यात येणार्‍या बंधनांच्या स्तरांविषयी आदेश दिले होते. शासनाने पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषांप्रमाणे राज्यांतील जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर ठरवले आहेत. महापालिका क्षेत्र आणि जिल्हा स्तरानुसार निर्बंध लागू केले जात आहेत. सांगली जिल्ह्याचा समावेश तिसर्‍या गटात झाल्यामुळे 14 जूनपासून सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत सुरु आहेत.

    गेल्या आठवड्यापासून राज्य शासनाच्या आदेशानुसार फक्त आरटीपीसीआर चाचणी अहवालानुसार कोविड पॉझिटीव्हीटी दर निश्चित करण्याच्या सूचना आहेत. 26 जून 2021 व 3 जुलै 2021 रोजी संपणार्‍या सलग दोन आठवड्याचा सांगली जिल्ह्यातील कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त व 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी चौथ्या टप्प्याप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेशास 12 जुलै रोजीच्या पहाटे 5 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

    जिल्ह्यात गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या नऊशे ते एक हजारपर्यंत स्थिर राहिली आहे. मात्र, सांगली महानगरपालिका आणि वाळवा तालुक्यातील रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिक आहे. जिल्ह्यातील अन्य शहरी भाग आणि ग्रामीण भागातील रुग्ण कमी होत आहेत. सांगली शहर आणि वाळवा तालुक्यातील रुग्णसंख्येमुळे पॉझिटिव्हीटी दर कमी होत नसल्याचे स्पष्ट झाले.

    जिल्ह्याचा समावेश गेल्या आठवड्यातही चौथ्या टप्प्यात कायम राहिला आहे. ब्रेक द चेनअंतर्गत चौथ्या टप्प्याच्या निर्बंधानुसार सोमवारपासून (दि. 5) कायम राहणार आहेत. चौथ्या टप्प्यानुसार केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. त्यामुळे पुढील आठवड्यातही अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने आणि व्यवसाय बंद राहणार आहेत. याबाबतच्या कडक निर्बंधाबाबतची अंमलबजावणीही पुढील आठवड्यात सुरुच ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिले आहेत. पॉझिटिव्हीटी दर कमी होवून निर्बंध शिथिल होण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना आणखी आठवडाभर प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले.