महाज्योतीची केली ‘येड्यांची जत्रा अन् खुळ्यांची चावडी; भाजप आमदाराची पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका

वडेट्टीवार यांनी प्रस्थापितांना मुजरा करत ओबीसी व भटक्या विमुक्त जाती यांचा छळ करण्याचा जणू काही विडाच उचलला आहे. या मालिकेत आता एमपीएससी-युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा कडलोट होतो आहे. कुठलीही पुर्वसूचना न देता 13 सप्टेंबरला अचानकपणे युपीएससीच्या चाळणी परीक्षेचे आयोजन केले. आता तीन दिवसात विद्यार्थी येणार कधी? परीक्षा देणार कधी? असे सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केले. 

    सांगली : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर ‘महाज्योती’च्या कारभारावरून घणाघाती टीका केली. वडेट्टीवार यांनी आपल्या गलथान कारभारामुळे ओबीसी व भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी असणाऱ्या ‘महाज्योती’ संस्थेला ‘येड्याची जत्रा अन खुळ्याची चावडी’ करून टाकली आहे, अशा शब्दात पडळकर यांनी वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला.

    वडेट्टीवार यांनी प्रस्थापितांना मुजरा करत ओबीसी व भटक्या विमुक्त जाती यांचा छळ करण्याचा जणू काही विडाच उचलला आहे. या मालिकेत आता एमपीएससी-युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा कडलोट होतो आहे. कुठलीही पुर्वसूचना न देता 13 सप्टेंबरला अचानकपणे युपीएससीच्या चाळणी परीक्षेचे आयोजन केले. आता तीन दिवसात विद्यार्थी येणार कधी? परीक्षा देणार कधी? असे सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केले.

    चाळणी परीक्षा तुम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा करून पुर्ननियोजीत केली नाहीतर आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पडळकर आणि वडेट्टीवार यांच्यात शाब्दिक वॉर सुरू आहे. वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा पडळकर यांनी केला होता. पडळकरांच्या या आरोपावर वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत 50 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे म्हटले होते.