संभाव्य पूर नियंत्रणासाठी महाराष्ट्र-कर्नाटक समन्यवयाने निर्णय घेणार : जयंत पाटील

    सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात पूरस्थिती निर्माण होऊ नये, दोन्ही राज्यांत पाणीसाठा आणि विसर्गबाबत समन्वय राखण्यात यावा, यासाठी शनिवारी बंगळुरात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने अलमट्टी जलाशयातील पाणीसाठा आणि विसर्ग यावर चर्चा झाली.

    मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यात अधिकार्‍यांसमोर ही बैठक झाली. या बैठकीत कृष्णा, भीमा नदीच्या पुराचे नियंत्रण कशा पद्धतीने करायचं आणि कोणत्या पद्धतीने दोन्ही राज्यांनी समन्यव ठेवायचा यावर चर्चा झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी बंगळुरात पत्रकारांशी बोलताना दिली.

    महाराष्ट्राने पुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी २०१९ पासूनच्या अनुभवावर यापूर्वीच रिअल टाईम डाटा ॲक्सिजिशन सिस्टम बसवली आहे. पण कर्नाटकने ती बसवलेली नाही. ही सिस्टम कर्नाटकने बसवावी, असे जयंत पाटील यांनी येडियुरप्पा यांच्या निदर्शनास आणून दिले. अलमट्टीच्या पुढे नारायणपूर यांची सिस्टम तयार झाली तर एकत्रित अलमट्टीची डायनॉमिकली पातळी नियंत्रणात ठेवणं शक्य होईल. अलमट्टी धरणातला येवा आणि पुढे जाणारा येवा आणि महाराष्ट्रात पडणारा पाऊस या सगळ्यावर नियंत्रण ठेवलं तर कुठून किती पाणी सोडायचं आणि कोणत्या धरणात किती पातळी ठेवायची आणि खास करुन अलमट्टीची, याच्यावर चांगल नियंत्रण ठेवता येईल, यावर चर्चा झाली. मला खात्री आहे की यंदाच्या पावसाळ्यात आणि पुढेही या पद्धतीत सुधारणा होत जाईल. पूर आलाच तर कर्नाटक आणि महाराष्ट्राचा समन्यव चांगला पद्धतीने साधण्यासाठी आजची बैठक उपयोगी ठरेल, असा विश्वास जयंत पाटील व्यक्त केला.

    कृष्णा-भीमा खोरे पाणलोट क्षेत्रातील नद्यांना येणारा महापूर, अलमट्टी आणि इतर जलाशयातून होणारा पाण्याचा विसर्ग यांच्यात समन्वय नसल्यामुळे २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावर्ती भागात महापूर आला होता. बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, विजापूर आदी ठिकाणी महापुराचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे गतवर्षीपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकाचे जलसंपदामंत्री पावसाळ्यात महापुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी समन्वयाची बैठक घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.