अपेक्सप्रकरणी महापालिका आयुक्तांना सहआरोपी करा; शिवसेना जिल्हाप्रमुख विभुतेंची मागणी

    सांगली : डॉ. कैलास जाधव आणि मदन जाधव यांच्या अपेक्स केअर कोविड सेंटरला परवानगी देण्यात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना ८७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी सह आरोपी करून अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

    विभुते म्हणाले, “अपेक्षा हॉस्पिटलमध्ये डेथरेट 45% असतानासुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यामागे महापालिका आयुक्त नितीन कापडणीस हेच आहेत. त्यांना महापालिकेच्या दोन्ही आरोग्य अधिकाऱ्यांनी साथ दिली असल्याने या आरोग्य अधिकार्‍यांना अटक करण्यात यावी. त्यांनी या दवाखान्याला बेकायदेशीररीत्या परवानगी देण्यासाठी दाखवलेले कार्यतत्परता आणि प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी केलेली गडबड त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीला साजेशी अशीच आहे. पोलीस प्रशासनाने आतापर्यंत नितीन कापडणीस आणि दोन्ही आरोग्य अधिकाऱ्यांना अटक का केली नाही, याचे आश्चर्य वाटते. 87 मृत्यू झाले असून प्रत्येक प्रकरणाचा तपास वेगळा करणे आवश्यक आहे. त्यासाठी हे प्रकरण सीआयडी सारख्या यंत्रणेकडे सोपवण्याची शिफारस जिल्हा पोलिस प्रमुख यांनी स्वतःहून केली पाहिजे.

    आम्ही या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. महापालिका आयुक्तांचा सहभाग असल्यामुळे याप्रकरणी दिरंगाई सुरू आहे. दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपापली भूमिका योग्य बजावली असली तरी महापालिका आयुक्तांचे वर्तन महापालिकेतील कारभारही एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे आहे.त्यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, आणि आरोग्य संचालक यांच्याकडे केली आहे. यावेळी शिवसेना नेते बजरंग पाटील, शंभूराज काटकर उपस्थित होते.

    शिवसेनेच्या मागण्या

    अपेक्स प्रकरणी जिल्हा पोलिस प्रमुख यांनी सखोल तपासासाठी सीआयडी चौकशीची शिफारस करावी, महापालिकेच्या दोन्ही आरोग्य अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी करा, डॉक्टर जाधव बंधू सोडून इतर अटकेतील आरोपी डॉक्टरांना माफीचे साक्षीदार बनवावे, आरोग्य संचालकांनी अपेक्षा प्रकरणाची वैद्यकीय दृष्टीने चौकशी करून पोलिसांना सहाय्य करावे.